Ubatha-MNS alliance – उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येऊनही महापालिका निवडणुकांसाठी उबाठा आणि मनसे यांच्यातील युतीची घोषणा गेल्या अनेक दिवसांपासून रखडली होती. दोन्ही बंधूंमध्ये अनेक बैठका झाल्या तरी युतीचा निर्णय जाहीर होत नव्हता. पालिका निवडणुकांसाठी उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार असतानाच आज दोन्ही पक्षांनी युतीबाबत अंतिम बोलणी करत जागावाटपाचा तिढा सोडवला. त्यामुळे उद्या जोरदार शक्तिप्रदर्शनासह उबाठा-मनसे युतीची घोषणा होईल, असे सांगितले जात आहे.
आज सकाळपासूनच मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यात बैठकांचे सत्र सुरू झाले. सुरुवातीला खा. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी जवळपास 20 मिनिटे चर्चा केली. संजय राऊत आणि राज ठाकरे यांची मागील पाच दिवसांतील ही तिसरी भेट होती. यावेळी बाळा नांदगावकरही उपस्थित होते. या बैठकीत भांडूप, शिवडी, जोगेश्वरी, दादर, माहीम यासारख्या दोन्हीही पक्षांची समान ताकद असलेल्या ठिकाणी कोणी, कुठे लढायचे यावर चर्चा झाली. युती व जागावाटपाबाबत आता विलंब नको. जास्त ताणू नका. दोन्ही बाजूंनी लवकर निर्णय घ्या, असा संदेश राज ठाकरे यांनी उबाठाचे आमदार अनिल परब यांना पाठवला होता. त्यानंतर हालचालींना वेग आला.
दुपारी साडेबारा वाजता ‘मातोश्री’वर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीला अनिल देसाई, संजय राऊत व सुधीर साळवी हे नेते उपस्थित होते. त्यावेळी जागावाटपाच्या मुद्यावर पक्षांतर्गत चर्चा झाली. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई हे पुन्हा ‘मातोश्री’वर बैठकीसाठी पोहोचले. जागवाटपाला अंतिम स्वरूप देण्याबरोबरच इतरही काही मुद्यांवर यावेळी विस्तृत चर्चा झाली. त्यानुसार शिवडी येथील प्रभाग क्र. 203, 204 व 205 बाबत असलेले मतभेद मिटवण्यात आले. यातील एक जागा मनसेला तर दोन जागा उबाठाला देण्याचे ठरले. दादरमधील प्रभाग क्रमांक 192 आणि 194 मध्ये उबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. प्रभाग क्रमांक 192 उबाठाला तर प्रभाग क्रमांक 194 मनसेला दिला जाणार आहे. भांडूपच्या प्रभाग क्रमांक 114 वरून दोन्ही पक्षांत असलेले मतभेदही सोडवण्यात आले. याशिवाय मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 157, मनसे 70 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 15 जागा देण्याचेही निश्चित करण्यात आले.
या वाटाघाटींबाबत उबाठाचे प्रवक्ते खा. संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन आणि एकत्रीकरण झालेले आहे. हे नाटक नसून दोन्ही बंधूंमधील हा प्रितीसंगम आहे. राजकीय युतीविषयी म्हणाल, तर मुंबई, नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे या ठिकाणच्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणच्या युतीच्या चर्चा संपलेल्या आहेत. या मोठ्या महानगरपालिकांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. त्यादृष्टीने काम चालू आहे. उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्याआधी शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे, धुमधुडाक्यात, वाजतगाजत केली जाईल. दोन्ही भाऊ एकत्र प्रचार करतील. या प्रितीसंगमात महाराष्ट्रातील जनता नक्कीच सहभागी होईल. उद्या दुपारी वरळी येथील एनएससीआय डोममध्ये जोरदार शक्तिप्रदर्शनासह संयुक्त पत्रकार परिषदेत ते युतीची घोषणा करतील, असे सांगितले जात आहे.
कंबोज भाजपाचा महापौरपदाचा उमेदवार?
भाजपाचा मुंबई महापौरपदाचा उमेदवार ठरलेला आहे. तो म्हणजे मोहित कंबोज, असे ट्वीट करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी भाजपाला चिमटा काढला. चित्रे यांनी आज पहाटे 5 वाजून 10 मिनिटांनी केलेल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या विधानांचा दाखला देत म्हटले की, भाजपाने मुंबईत आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असले अमराठी उपमहापौर दिले. त्यामुळे आज पत्रकार जेव्हा भाजपाला विचारतात की, मुंबईचा महापौर मराठी असेल का? त्यावर फडणवीस म्हणतात, महापौर महायुतीचाच होणार. शेलार म्हणतात, महापौर हिंदू होणार. पण कुणीही छातीठोकपणे सांगत नाही की, महापौर मराठीच होणार. मराठी माणसा, आपल्या मुंबईवर अशा उपर्याला राज्य करू द्यायचे का? धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल. पण स्वाभिमानी मराठी माणसाने अशांना हिसका दाखवावा!
खासदार राऊतांचा
राहुल गांधींना फोन
एका बाजूला उबाठा-मनसेत युतीसाठी अंतिम वाटाघाटी चालू असताना खा. संजय राऊत यांनी काँग्रेससोबत युतीसाठी खा. राहुल गांधी यांना फोन करून चर्चा केली. या चर्चेतून नेमके काय निष्पन्न झाले त्याचा तपशील समजू शकला नसला तरी भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला सोबत घेण्यावर शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा भर आहे. मात्र मनसेला सोबत घेतल्याने आपले नुकसान होईल आणि आघाडीत आपल्या वाट्याला कमी जागा येतील म्हणून काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार आहे. तसेच काँग्रेसने वंचित सोबत युतीची तयारी दर्शवली असून चर्चेसाठी बैठकाही सुरू आहेत.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
जर तर ची गोष्ट’चे दिग्दर्शक रणजित पाटील काळाच्या पडद्याआड
बांगलादेशात रक्तरंजित थराराचे सत्र सुरुच; बांगलादेशात शेख हसिना विरोधी नेत्यावर गोळीबार









