Sudhir Mungantiwar : राज्यातील नगरपरिषद निवडणुकीत भाजपने नंबर वनचा पक्ष म्हणून यश मिळवले असले, तरी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील पराभवाने पक्षांतर्गत वादाला तोंड फोडले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच्याच पक्षावर ओढलेल्या ताशेऱ्यांनंतर आता भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर भाष्य केले आहे.
“सुधीरभाऊंची भावना योग्य असली, तरी तांत्रिकदृष्ट्या मंत्रिपद असते तरच जिंकलो असतो असे नसते,” अशा शब्दांत बावनकुळे यांनी मुनगंटीवारांचे दावे फेटाळून लावले आहेत.
बावनकुळेंचे मुनगंटीवारांना प्रत्युत्तर
चंद्रपूरमध्ये 11 पैकी केवळ 2 जागांवर भाजपला विजय मिळवता आला, तर काँग्रेसने 8 जागा जिंकत बाजी मारली. या पराभवानंतर मुनगंटीवार म्हणाले होते की, “काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, तर आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली.”
यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, “मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा कोणताही थेट संबंध नसतो. देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवारांना नेहमीच पाठबळ दिले आहे आणि ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांच्या मनात काही शंका असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, पण नाराजीचा निकालाशी संबंध लावणे योग्य नाही.”
चंद्रपूरच्या पराभवाचे होणार ‘आत्मचिंतन’
विदर्भातील 100 पैकी 59 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले असताना चंद्रपुरात पक्षाला मोठा फटका बसला आहे. नागपूरमध्ये 27 पैकी 22 जागा जिंकणाऱ्या भाजपला चंद्रपूर आणि वर्ध्यात अपेक्षित यश मिळाले नाही.
यावर बावनकुळे यांनी कबुली दिली की, “चंद्रपूर हा भाजपचा गड आहे, तिथे आम्ही मागे का पडलो याचे नक्कीच आत्मचिंतन करावे लागेल. पराभवातून शिकणे आणि पुढे जाणे हेच महत्त्वाचे आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही पुन्हा ताकदीने उतरू.”
मुनगंटीवारांचा पलटवार
बावनकुळे यांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, “बावनकुळे साहेबांना आता मंत्रिपद आणि विजयाचा संबंध वाटत नाही हे साहजिक आहे, पण मध्यंतरी जेव्हा त्यांची स्वतःची शक्ती कमी करण्यात आली होती, तेव्हा त्यांनाही असेच वाटत होते.” मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरही भाष्य केले की, “सत्ता आणि पदे ही कायमची नसतात, ती येतात आणि जातात. मी केवळ कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून माझी भूमिका मांडत आहे.” या शाब्दिक युद्धामुळे भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.
हे देखील वाचा – Baramati election: बारामतीत ‘दादां’ना नडले आणि निवडूनही आले! तिकिट नाकारलेल्या निलेश इंगुलेंनी दंड थोपटून दाखवली ताकद









