कॅब अॅग्रीगेटर्स असलेल्या ओला (Ola) आणि उबर (Uber) या कंपन्यांकडून अँड्राइड व आयफोन यूजर्सला वेगवेगळे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याचे अनेक व्हीडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता या प्रकरणात थेट सरकारकडून ओला आणि उबरला नोटीस बजावत उत्तर मागण्यात आले आहे.
वेगवेगळ्या फोन यूजर्सला वेगवेगळी किंमत आकारण्यात येत असल्याची तक्रार वारंवार समोर आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कंझ्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटी (CCPA) कडून कंपन्यांना ही नोटीस जारी करण्यात आले आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देखील ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘मोबाईल मॉडेल्स च्या (iPhone/Android) आधारे किमतींमध्ये दिसणाऱ्या फरकाबाबतच्या अनुषंगाने कंझ्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटीच्या माध्यमातून प्रमुख कॅब अॅग्रीगेटर्स ओला आणि उबर यांना नोटिसा पाठवून यावर स्पष्टीकरण मागवण्यात आले असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
कॅब अॅग्रीगेटर्सकडून त्यांच्या डिव्हाइसच्या आधारावर प्रवासासाठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता या नोटीसवर कंपन्यांकडून काय उत्तर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.