Home / arthmitra / महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ योजनेंतर्गत आता लाभार्थ्यांना देणार 2500 रुपये

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ योजनेंतर्गत आता लाभार्थ्यांना देणार 2500 रुपये

Maharashtra Government Scheme

Maharashtra Government Scheme: संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

या निर्णयामुळे आता दिव्यांगांना मिळणारे अर्थसहाय्य 1,500 रुपयांवरून वाढून 2,500 रुपये प्रति महिना होणार आहे.

कोणाला मिळणार लाभ?

राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सध्या 4 लाख 50 हजार 700 आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत 24 हजार 3 दिव्यांग लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होईल. वाढीव अनुदान ऑक्टोबर 2025 पासून लागू करण्यात येईल. या वाढीसाठी सरकारला अतिरिक्त 570 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना काय आहे?

ही योजना 1980 पासून राबविण्यात येत आहे, ज्याचा मुख्य उद्देश राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक किंवा मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला आणि तृतीयपंथी यांना आर्थिक मदत करणे आहे.

योजनेच्या प्रमुख अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे किंवा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

पात्र व्यक्ती: 65 वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, किमान 40% अपंगत्व असलेले दिव्यांग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, घटस्फोटित महिला, तसेच तृतीयपंथी आणि देवदासी यांचा यात समावेश होतो.

अनुदानाचे स्वरूप: पात्र कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असले तरीही प्रत्येकी 2,500 रुपये प्रति महिना अर्थसहाय्य दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत आणि आवश्यक कागदपत्रे

अर्जदार संबंधित तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात अर्ज करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे: वयाचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला (किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीतील समावेशाचा साक्षांकित उतारा), आणि अपंगत्व किंवा आजाराच्या बाबतीत सरकारी रुग्णालयाचा वैद्यकीय दाखला.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

इरफान पठाण, धोनी आणि ‘हुक्का’ वाद; नक्की काय घडले? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

 मुंबईतील आंदोलन संपताच मराठ्यांवर नऊ गुन्हे दाखल