UPI ATM: भारताची सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्रणाली युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही लवकरच ATM चे काम करताना दिसू शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) RBI कडे देशभरातील 20 लाखांहून अधिक बँकिंग कॉरेस्पॉन्डंट (BC) केंद्रांवर QR कोड वापरून रोख रक्कम काढण्याची परवानगी मागितली आहे.
जर याला मंजुरी मिळाली, तर भारतात रोख रक्कम काढण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकते. यामुळे थेट क्यूआर कोड स्कॅन करून रोख पैसे काढता येतील.
हे कसे काम करेल?
ही प्रक्रिया कोणत्याही नियमित UPI व्यवहारासारखीच सोपी असणार आहे. ग्राहक त्यांच्या UPI ॲपमधून बँकिंग कॉरेस्पॉंडंटने दिलेल्या QR कोडला स्कॅन करतील, पेमेंटला मंजुरी देतील आणि रोख रक्कम घेऊन जातील. या प्रणालीमध्ये ग्राहकाच्या खात्यातून पैसे त्वरित डेबिट होतील आणि BC च्या खात्यात जमा होतील, ज्यामुळे दोन्ही बाजूंना सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित होईल.
सध्या, व्यापाऱ्यांच्या ठिकाणाहून UPI द्वारे रोख रक्कम काढण्याची मर्यादा 1,000 ते 2,000 रुपये प्रति व्यवहार आहे. नवीन नियमांनुसार ही मर्यादा 10,000 रुपये प्रति व्यवहार पर्यंत वाढू शकते.
भारतासाठी हे महत्त्वाचे का आहे?
बँकिंग कॉरेस्पॉंडंट ग्रामीण आणि निमशहरी भागात आर्थिक सेवा पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पूर्णवेळ बँक शाखा नसलेल्या ठिकाणी ते नागरिकांसाठी महत्त्वाचे केंद्र आहेत. यापैकी अनेक ठिकाणी आधीपासूनच आधार-आधारित सेवा आणि मायक्रो-ATM द्वारे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
या नेटवर्कमध्ये UPI समाविष्ट केल्याने रोख रक्कम काढणे खूप सोपे होईल. विशेषतः ज्या लोकांचे बोटांचे ठसे अस्पष्ट आहेत किंवा ज्यांना कार्ड संबंधित फसवणुकीची भीती आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल.
मात्र, या सुविधेमुळे धोका देखील निर्माण होऊ शकता. या प्रणालीमुळे नागरिकांची फसवणूक होण्याची देखील शक्यता आहे. याशिवाय सायबर गुन्ह्यांचे प्रकार वाढवून गैरव्यवहार होऊ शकतात.
हे देखील वाचा – ‘माझे मित्र नरेंद्र मोदी’; ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, ‘या’ मुद्द्यांवर झाली महत्त्वाची चर्चा