पुणे – पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणातील ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरेचा रुबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहभाग आढळला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तावरेला आता सहआरोपी करण्यात येणार आहे.
रुबी हॉल रुग्णालयात २०२२ मध्ये रुग्ण अमित साळुंके यांच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्याला किडनी देणाऱ्या महिलेने रुग्णालयात असताना तिच्या बहिणीकडे पैशांबाबत विचारणा केली. त्यावर एजंटने चार लाख रुपये मिळतील, असे सांगितल्याचे ती म्हणाली. पण पंधरा लाख रूपये मिळतील, असे एजंटने सांगितल्याची ती बहिणीला म्हणाली. त्यानंतर किडनी देणारी महिला आणि तिच्या नातेवाईकांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टर व व्यवस्थापनातील व्यक्ती आदींचा समावेश होता.
या किडनी रॅकेट प्रकरणी राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली १० लोकांची समिती नेमली. या चौकशी समितीने त्याचवेळी डॉ. तावरे याचा सहभाग निश्चित केला होता. तसे अहवालातदेखील नमूद करण्यात आले होते. पण तावरे हा एफआयआरमधून स्वत:चे नाव वगळण्यात यशस्वी झाला होता.
जुन्या गुन्ह्यांचा तपास करताना वरिष्ठ पोलिसांनी किडनी रॅकेट गुन्ह्यातील समितीचा अहवाल पाहिला. त्यात तावरेचे नाव असतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल नसल्याचेही निदर्शनास आले. यामुळे पोलिसांनी किडनी प्रकरणाचा पुन्हा तपास केला. तेव्हा डॉ. तावरे यांची किडनी प्रत्यारोपणात मुख्य भूमिका असल्याचे उघड आल्याने पोलीस आयुक्तांनी त्यांना या प्रकरणातदेखील सहआरोपी करण्यात यावे असे आदेश दिले. गेल्या वर्षभरापासून अजय तावरे पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन कारचालकाच्या रक्त नमुन्यातील अदलाबदली प्रकरणी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला या प्रकरणात जामीन मिळालेला नाही. आता किडनी रॅकेटप्रकरणी लवकरच गुन्हे शाखेकडून त्याचा ताबा घेतला जाणार आहे.