सातारा – उन्हाळा असूनही जिल्ह्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे.कारण, सलग सहा दिवस आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. सातारा शहरात तर पावसाची संततधारच आहे. कृष्णा आणि कोयना नदीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे.
या अवकाळी पावसामुळे नागरिकांना सूर्यदर्शन होईना. काल शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारपासून जिल्ह्यात धुवाधार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि कोयना नदीची पाणीपातळी वाढत चालली आहे. संगम माहुली येथील छत्रपती शाहू महाराजांची समाधी पाण्याखाली गेली आहे.
मुसळधार पावसामुळे काही रस्ते खचले असून अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. सर्वाधिक पाऊस जावळी तालुक्यात १०७.३ मिलिमीटर इतका पडला. महाबळेश्वर तालुक्यात १०३ तसेच वाई ७८, सातारा ६५.५, पाटण ४४.५,कोरेगाव ४३.९, खंडाळा ४३.३ मिमी पाऊस झाला आहे.तर दुष्काळी माण तालुक्यात १०.२, खटावला १३.१ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.