आम आदमी पक्ष एकट्याने बिहार निवडणूक लढणार


गांधीनगर- गुजरात आणि पंजाब पोटनिवडणुकांमध्ये चांगल्या कामगिरीनंतर आम आदमी पक्ष(आप) यावर्षींच्या अखेरीस होणाऱ्या पंजाब विधानसभेच्या निवडणुका एकट्याने लढवण्याचे ठरवले आहे. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज घोषणा केली. केजरीवाल यांच्या घोषणेमुळे आधीच डळमळीत झालेल्या इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसला आहे.
केजरीवाल गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. इथे त्यांनी पक्षाच्या सदस्यता मोहिमेला सुरुवात केली. गुजरातमधील गांधीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले की, आप बिहार निवडणूक एकट्याने लढेल. आपचा विरोधी पक्षाच्या इंडिया ब्लॉकशी असलेला संबंध फक्त 2024 च्या लोकसभा निवडणुकीपुरता होता. आता कोणतीही आघाडी नाही. आमची काँग्रेससोबतही युती नाही. म्हणूनच आम्ही गुजारतमधील विसावदर पोटनिवडणुकीत वेगळे लढलो. या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा तिप्पट मते मिळवून विजयी झालो. आता आप हाच पर्याय असल्याचा स्पष्ट संदेश जनतेने दिला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी भाजपाबरोबर काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले की, भाजपा सरकारने गुजरातला उद्ध्वस्त केले आहे. सुरतसह अनेक शहरे पाण्याखाली बुडाली. शेतकरी, तरुण आणि व्यापारी यांच्यासह सर्व वर्ग त्रासलेले आहेत. तरीही गुजरातमध्ये भाजपा जिंकत आहे. कारण लोकांकडे पर्याय नव्हता. भाजपाला विजयी करण्यासाठी गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला कंत्राट दिले आहे. भाजपाने आपची मते कापण्यासाठीच काँग्रेसला पाठवले होते. मात्र, काँग्रेसने नीट काम न केल्याने भाजपाने काँग्रेसच्या लोकांना फटकारले आहे. आता आप आली आहे. लोक आपकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. विसावदरमध्ये हेच दिसून आले आहे. विसावदरमधील विजय नुसता हा मोठा विजय नाही, तर 2027 चा उपांत्य सामना आहे. आम्ही भविष्यात गुजरातमध्ये निवडणुका लढवू आणि जिंकू.
दिल्लीच्या विधासभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस यांच्यात युती झाली नव्हती. आपला त्याचा फटका बसल्याचे म्हटले जात आहे. मात्र, तरीही केजरीवाल यांनी बिहारमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा करून इंडिया आघाडीला अडचणीत टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडी विखुरल्यासारखी झाली असून महाराष्ट्रातही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीतील पक्ष वेगवेगळे लढण्याची शक्यता आहे.