ऑपरेशन सिंदूर अर्ध्यावर का थांबवले? संसदेत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

Why was Operation Sindoor stopped halfway? Opposition attacks government in Parliament

नवी दिल्ली- काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य दलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर आज लोकसभेत सविस्तर चर्चेची सुरुवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानने हार मानून युध्द थांबण्याचा प्रस्ताव ठेवला. तो भारताने मान्य केला, असे राजनाथ सिंह आपल्या भाषणात म्हणाले. या चर्चेत विरोधी पक्षांच्या वतीने भाग घेणारे काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी राजनाथ सिंह यांच्या भाषणातील एकेका मुद्याची चिरफाड केली. ऑपरेशन सिंदूर जर यशस्वी झाले होते तर त्याचवेळी पाकव्याप्त काश्मीर हिसकावून का घेतले नाही, असा सवाल करत गोगोई यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
राजनाथ सिंह यांनी आपल्या संपूर्ण भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारंवार उल्लेख करून त्यांच्या कार्यकाळातच ऑपरेशन सिंदूरसारखी धडक कारवाई करण्यात आली, असा दावा केला. मोदींच्या नेतृत्वाखालील भारत हा 2014 च्या पूर्वीचा भारत राहिलेला नाही. आताचा भारत हा दहशतवादाच्या विरोधात कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. दहशतवाद्यांना घरात घुसून ठार मारण्याची ताकद आणि हिंमत आजच्या भारतामध्ये आहे. याची चुणूक ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने पाहिली आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्याचा गोगोई यांनी आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्याला शंभर दिवस उलटून गेले तरी हल्लेखोरांना तुम्ही पकडू शकला नाहीत. हल्लेखोर कुठून आले, त्यांना कोणी आश्रय दिला, निष्पाप, निशस्त्र पर्यटकांवर गोळ्या घालून ते सहीसलामत पळून गेले हे कोणाचे अपयश आहे, तुमच्याकडे अत्याधुनिक लढाऊ विमाने, ड्रोन, रडार यंत्रणा, रणगाडे सर्वकाही आहे आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाकिस्तानने जर ऑपरेशन सिंदूरदरम्यान स्वतः हार मानली होती तर त्याचवेळी त्यांच्याकडून आपला बळकावलेला पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा प्रयत्न का केला गेला नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती गोगोई यांनी केली.
ते पुढे म्हणाले की भारत-पाकिस्तान दरम्यानचे युध्द आपण थांबवले असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किमान 26 वेळा बोलले आहेत. त्यांना एका शब्दाने मोदींनी उत्तर दिले नाही. यामागे काय कारण आहे? भारताची कोणती कमजोरी आहे हे जनतेला समजले पाहिजे. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे असफल झाले आहे. पाकिस्तानी दहशतवादी भारतात येऊन निरपराध पर्यटकांची निर्दयीपणे हत्या करतात आणि जगातील एकही देश भारताच्या बाजूने बोलत नाही. दहशतवादी कृत्याचा निषेध करत नाही, हे मोदींच्या परराष्ट्र नीतीचे घोर अपयश आहे.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताची किती विमाने पाडण्यात आली याची माहिती देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. याबाबत बोलताना राजनाथ सिंह यांनी अंतिम निकाल काय लागला त्याकडे बघा, त्याच्याआधी काय काय घडले याला फारसे महत्त्व नाही, असे म्हणत नुकसान किती झाले हे सांगण्याचे टाळले होते.
त्यावर गोगोई यांनी नेमके बोट ठेवले. भारतीय वायूदलाकडे केवळ 35 राफेल लढाऊ विमाने आहेत. त्या एकेका विमानाची किंमत अब्जावधीच्या घरात आहे. त्यामुळे आपली किती विमाने पाकिस्तानने पाडली हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे. उरी आणि पुलवामा हल्ल्याच्या वेळीदेखील सरकारने पाकिस्तानचे कंबरडे मोडल्याच्या वल्गना केल्या होत्या. त्यानंतर पहलगाम हल्ला झाला. उरी झाला, पुलवामा झाला, पहलगाम हल्ला झाला, सर्व तुमच्याच काळात झाले. प्रत्येक हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा पुरता बिमोड केला असे सांगून गृहमंत्री अमित शहा जनतेला आश्वस्त करतात. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद निपटून काढल्याचा दावा करत देशभरातील पर्यटकांना काश्मीरमध्ये येण्याचे आवाहन करतात. अशा परिस्थितीत पहलगामसारखा दहशतवादी हल्ला होतो आणि त्यात निष्पाप पर्यटक मारले जातात हे अपयश गृहमंत्र्यांचे आहे. त्यांना लेफ्टनंट गव्हर्नरच्या अंगावर ही जबाबदारी झटकून त्यांच्यामागे लपता येणार नाही. हे सरकार कमजोर आणि डरपोक आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्याला टूर कंपन्यांना दोषी ठरवले. या कंपन्यांनी न सांगता पर्यटकांना बायसरन खोऱ्यात का आणले? असे सरकारने विचारले. सरकार म्हणते की, आम्ही जनतेची काळजी घेतो. मग पहलगाम हल्ला झाला तेव्हा आपले सैनिक पायी का आले, आपल्या रुग्णवाहिका एक तासाने का आल्या? या सरकारमध्ये अहंकार आला आहे, त्यांना वाटते की कुणी त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. पण आम्ही प्रश्न विचारला. हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तो दौरा पूर्ण केला आणि मग ते भारतात परतले. परत आल्यानंतरही ते पहलगामला गेले नाहीत. ते बिहारला गेले आणि तिथे त्यांनी निवडणूक प्रचाराचा आरंभ केला. या सर्व गोष्टींचा सरकारने जबाब दिलाच पाहिजे.
ऑपरेशन सिंदूरची गरज का?
अरविंद सावंत यांचा सवाल

लोकसभेत आज ऑपरेशन सिंदुरवर चर्चा झाली त्यावेळी बोलताना उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी ऑपरेशन सिंदूरची गरज का भासली? असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले की, मी काही काळ केंद्रीय मंत्री होतो. त्यावेळी जम्मू-काश्मीरला गेलो होतो. तिथे प्रत्येक चौकात, प्रत्येक वळणावर जवान तैनात होते. मग, त्या दिवशी पहलगाममध्ये एकाही ठिकाणी सुरक्षा का नव्हती? कोणत्या अधिकाऱ्याने हे आदेश दिले की, त्या दिवशी तिथे जवान तैनात राहणार नाहीत? जर तपास करायचाच असेल, तर सुरुवात इथून करा. हवाई संघर्षाच्या वेळी जेव्हा पाकिस्तान गयावया करत होता, तेव्हा भारताने कोणत्याही अटीशिवाय युद्धविराम का केला? आपल्याला त्यांच्यावर कठोर अटी, निर्बंध लावायला हव्या होत्या. पण आपण शांत राहिलो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत म्हणत आहेत की, भारत-पाकिस्तान युद्ध त्यांनी थांबवले. भारताकडून कोणीही हे स्पष्टपणे सांगितले नाही की ट्रम्प खोटे बोलत आहेत. पंतप्रधान म्हणतात, आम्ही दहशतवाद्यांना लक्ष्य करून कारवाई केली, निष्पाप जनतेवर नाही आणि तरीही जेव्हा दहशतवाद्यांना अटक होत नाही, तेव्हा तुमच्या मनाला वेदना होत नाहीत का? तुम्ही अमेरिकेत जाता, पंचायत राजच्या कार्यक्रमात जाता, बिहारमध्ये जाऊन इंग्रजीत राजकीय भाषण करता, पण पहलगामला जात नाही. मणिपूरमधील हिंसाचार झाल्यावर आजतागायत तुम्ही तिथे गेलात का?