कोरोनाचे ३७८३ रुग्ण! २८ मृत्यू! केरळपाठोपाठ महाराष्ट्र दुसरा

नवी दिल्ली- देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत असून, गेल्या चोवीस तासांत देशभरात 511 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या कोरोनाचे 3783 सक्रिय रुग्ण आहेत. त्यात (1,400 रुग्ण) केरळ पाठोपाठ महाराष्ट्र (824 रुग्ण) दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 28 वर पोहोचला आहे. कोरोनाला आताच अटकाव केला नाही, तर तो पुन्हा हाहाकार उडवेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीला हाँगकाँग, सिंगापूर या देशात कोरोनाचे नवे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. त्यानंतर हा विषाणू इतर आशियाई देशांतही पसरू लागला. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, देशात 22 मे रोजी 257 सक्रिय रुग्ण होते. 26 मे रोजी हा आकडा 1010 इतका झाला. आता तो 3,700 च्या वर गेला असून, त्यात दररोज मोठी वाढ होत आहे. 9 दिवसांतील रुग्णांची ही वाढ 1,300 टक्क्यांहून अधिक आहे. तर गेल्या एका आठवड्यात एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 1818 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशातील 20 राज्यांत कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यात सर्वाधिक 1,400 कोरोना रुग्ण केरळमध्ये आहेत. महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर असून, महाराष्ट्रात 824 (मुंबईत 22, पुण्यात 24) रुग्ण आहेत, तर त्याखालोखाल दिल्लीत 436 रुग्ण आहेत. गुजरातमध्ये 320, कर्नाटकमध्ये 238, पश्चिम बंगालमध्ये 205, तामिळनाडूमध्ये 185, उत्तर प्रदेशात 149 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 68 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 30 मुंबईत आणि 15 पुणे महानगरपालिका हद्दीतील आहेत. कल्याण-डोंबिवली, रायगडमध्येही नवीन रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक प्रत्येकी 7 मृत्यू नोंदवले गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत सर्वाधिक 82 रुग्ण पश्चिम बंगालमध्ये सापडले आहेत. दिल्ली (61) आणि गुजरात (55) या राज्यातही कोरोना रुग्णांत मोठी वाढ नोंदवली आहे. तर दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी वसईतील एका 43 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला. बंगळुरूमध्ये काल लसीकरण झालेल्या 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कर्नाटक सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी करून गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे, शारीरिक अंतर राखण्याचे आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. ताप, खोकला, छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, लोकांना ताबडतोब चाचणी करण्यासही सांगण्यात आले आहे.


कोरोनाच्या ऑमिक्रॉन या उपप्रकाराचा जेएन.वन आणि एलएफ.सेव्हन आणि एनबी.वन.एट हे उपप्रकार या नव्या लाटेला कारणीभूत आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जेएन.वन या उपप्रकाराला जागतिक आरोग्य संघटनेने डिसेंबर 2023 मध्येच व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट घोषित केले आहे. हा उपप्रकार कोरोनाच्या इतर उपप्रकारापेक्षा जास्त धोकादायक नसला तरी तो जास्त वेगाने पसरतो. ताप, सर्दी, खोकला, घशाला खवखव आणि अंगदुखी अशी त्याची काही लक्षणे आहेत. हा उपप्रकार रोग प्रतिकारकशक्ती कमी करत असल्याने इतर आजार असलेल्यांनी काळजी घ्यायला हवी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
5:59 झच्, 6/1/2025 डराशशी घरीरालश: पेज हेडिंग 4 कॉलम