वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातून त्यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे सहकारी आणि जिगरी दोस्त असलेले टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क बाहेर पडल्यानंतर आता दोघांमध्ये वाद विकोपाला पोहोचला आहे. मस्क यांनी ट्रम्प यांना कृतघ्न म्हणत यांच्यावर महाभियोग चालवावा आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांना राष्ट्राध्यक्ष करावे, अशी मागणी केली आहे. अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या प्रकरणाशी संबंधित एपस्टाइन प्रकरणाशी ट्रम्प यांचा संबंध असल्याचाही गंभीर आरोप केला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्यावर पलटवार करत अमेरिकेच्या बजेटमधील अब्जावधी डॉलर वाचवण्यासाठी मस्कचे सरकारी अनुदान आणि ड्रॅगन स्पेसक्राफ्ट यासारखे करार रद्द करावे लागतील, अशी अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. या दोघांमधील वादामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर अमेरिकन नागरिक सोशल मीडियावर दोघांची खिल्लीही उडवत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यावर उद्योगपती इलॉन मस्क यांचा आपल्या प्रशासनात समावेश करत त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी मस्क यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी खात्याचे प्रमुख बनवले होते. त्यांच्याकडे बजेटमध्ये कपात करण्याबाबतच्या निर्णयांचे अधिकार होते. ट्रम्प यांच्या ओव्हल ऑफिसमध्ये मस्क यांचा मुक्त वावर होता. मात्र, ट्रम्प यांचे देशांतर्गत धोरण आणि कर विधेयकावर मस्क यांनी टीका केली. ट्रम्प या विधेयकाचा प्रचार ’बिग ब्युटीफुल बिल’ असा करत होते. त्याचेच वर्णन मस्क यांनी बिग अग्ली बिल (अतिशय घृणास्पद विधेयक) असे केले. या विधेयकामुळे अमेरिकेचा तोटा होईल, असे मस्क यांनी म्हटल्यानंतर दोघांमध्ये वितुष्ट आले. मस्क यांनी ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जुन्या टिप्पण्या सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली, ज्यात त्यांनी अमेरिकन सरकारच्या वाढत्या खर्च आणि तुटीबद्दल चिंता व्यक्त केली होती. यामुळे हा वाद आणखी वाढला. त्यानंतर मस्क यांनी गेल्या आठवड्यात ट्रम्प यांची साथ सोडली. तेव्हापासून दोघे एकमेकांवर जाहीर टीका आहेत. यामुळे मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे शेअर 17 टक्के घसरले.
मस्क यांनी आपल्याच मालकीच्या एक्सवरून आणि ट्रम्प यांनी सोशल ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एकमेकाविरोधात पोस्ट केल्या आहेत. ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये म्हटले की, इलॉन खूप त्रास देत होता, मी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. मी त्याची इलेक्ट्रिक वाहनांसाठीची सवलत रद्द केली. त्याने लोकांना अशा इलेक्ट्रिक कार खरेदी करायला लावल्या ज्या कोणालाही नको होत्या (जे मी गेल्या अनेक महिन्यांपासून त्याला सांगत होतो!), त्यामुळे तो वेडा झाला आहे. तर काल रात्री ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मला वाटते की, त्याने विधेयकाऐवजी माझ्यावर टीका करायला हवी. कारण हे विधेयक विलक्षण आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी खर्च कपात आहे. मस्क यांना या विधेयकाची सर्वांपेक्षा जास्त आणि पूर्ण माहिती होती. त्याला त्याबद्दल काहीच अडचण नव्हती. आपल्याला इलेक्ट्रिक व्हेईकलसंबंधी ऑर्डरमध्ये कपात करावी लागेल असे त्याला समजले तेव्हा त्याला अचानक अडचण आली. कारण त्याचे अब्जावधींचे नुकसान झाले असते. मी त्याची अडचण समजू शकतो. परंतु त्याला विधेयकाबद्दल सर्व काही माहीत होते. त्याने कधीही तक्रार केली नाही, हे खरे आहे. परंतु सरकारमधून बाहेर पडताच त्याचे मत बदलले. मी त्यांच्याबद्दल खूप निराश आहे. मी त्याला खूप मदत केली आहे. मस्क आणि माझे खूप चांगले संबंध होते. पण भविष्यात हे संबंध चांगले राहतील की नाही, हे मला माहीत नाही.
मस्क यांनी ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, मला या विधेयकाबद्दल काहीही माहिती नव्हती. मला हे विधेयक कधीही दाखवण्यात आले नव्हते. ते इतक्या लवकर मध्यरात्री मंजूर झाले की कोणत्याही खासदाराला ते वाचण्याची संधीही मिळाली नाही. मी मदत केली नसते तर ट्रम्प निवडणूक हरले असते. डेमोक्रॅट्सनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज जिंकले असते. तर रिपब्लिकननी सिनेटमध्ये 51-49 अशा फरकाने विजय मिळवला असता. ट्रम्पची ही कृतघ्नता आहे. विचार करा की, ट्रम्पकडे अजून फक्त 3.5 वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे, पण मी पुढची 40 हून अधिक वर्षे राहणार आहे. मस्क यांनी असाही खळबळजनक दावा केला की, डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव जेफ्री एपस्टाईनच्या फायलींमध्ये आहे. आता मोठा गौप्यस्फोट करण्याची वेळ आली आहे. ट्रम्प यांचे नाव या फायलींमध्ये असल्यामुळेच त्या सार्वजनिक केल्या गेल्या नाहीत. डोनाल्ड ट्रम्प, तुमचा दिवस चांगला जावो. भविष्यासाठी ही पोस्ट लक्षात ठेवा. सत्य बाहेर येईल.
अमेरिकन अब्जाधीश जेफ्री एपस्टाईन याच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण व तस्करीचा आरोप होता. या प्रकरणात जगभरातील अनेक उच्चभ्रूंची नावे आली होती. व्हर्जिनिया गिफ्रे नावाच्या महिलेने अनेक खुलासे करून या प्रकरणाचा भांडाफोड केला. एपस्टाईन याला वेश्याव्यवसाय आणि अल्पवयीन मुलीला फसवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. त्याला फक्त 13 महिन्यांची सजा झाली.2019 मध्ये त्याचे निधन झाले. मस्क यांनी आता ट्रम्प यांचा या प्रकरणाशी संबंध जोडून खळबळ माजवली आहे.
ट्रम्प यांनी अनुदान रद्द करण्याच्या धमकीनंतर मस्क यांनी त्यांच्या मालकीच्या स्पेसएक्स कंपनीचे ड्रॅगन हे अंतराळयान ताबडतोब बंद करण्याचा इशारा दिला होता. ड्रॅगन अंतराळयान 2012 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अन्न, वैज्ञानिक उपकरणे आणि इतर आवश्यक साहित्य पोहोचवण्यासाठी नासा वापरते. परंतु मस्क यांच्यावर टीका झाल्यानंतर मस्क यांनी आपली धमकी मागे घेतली.
