अहमदाबाद – अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान उड्डाण होताच कोसळले आणि २६० जणांचा मृत्यू झाला. हा अपघात तांत्रिक बिघाड झाल्याने घडला की मानवी चुकीने घडला, या प्रश्नाचे उत्तर महत्त्वाचे आहे. या अपघाताची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून त्याचा १५ पानी अहवाल सादर झाला आहे. यात म्हटले आहे की, उड्डाणानंतर लगेच दोन्ही इंजिनचा इंधनपुरवठा बंद झाला. तेव्हा पायलटने सहपायलटला विचारले की तू इंधन बंद केले का? यावर सहपायलट म्हणाला की मी काहीच केले नाही.
या संवादानंतर अपघाताबाबत पुन्हा तर्कवितर्क लावले जात आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, अजून पूर्ण अहवाल आलेला नाही. एएआयबीने सांगितले आहे की अजून चौकशी बाकी आहे. आपली विमाने व आपले पायलट उच्च दर्जाचे आहेत त्यामुळे वेगळे काही घडले असेल, असे वाटत नाही.
या अहवालामुळे हे मात्र स्पष्ट झाले की हवामान किंवा पक्षी धडकल्याने अपघात झालेला नाही. स्वतः पायलट असलेले भाजपा खासदार राजीव प्रताप रूडी म्हणाले की , विमानाने उड्डाण केले म्हणजे त्यावेळी इंजिन व्यवस्थित चालले. उड्डाण घेतल्यानंतर दोन्ही इंजिन बंद पडली, ती का बंद पडली याचा शोध घ्यायचा आहे. इंजिन बंद पडल्यावर दोन्ही पायलटनी इंधन पुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण इतक्या उंचावर यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, एवढेच मी आता बोलू शकतो. विमान उड्डाण केले तेव्हा इंजिनचा इंधन पुरवठा सुरू होता. हा इंधन पुरवठा आपोआप बंद होत नाही. इंधन पुरवठा बंद करायचा तर स्विच हलवावा लागतो. यामुळे या विमानाचा इंधन पुरवठा सुरू असताना बंद कसा झाला, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) अहवालानुसार, विमानाने १२ जून रोजी दुपारी १.३९ वाजता रनवे २३ वरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच वैमानिकांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेदे कॉल (आणिबाणीचा संदेश) दिला होता, परंतु त्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटचा सिग्नल टेकऑफनंतर लगेच अवघ्या १९० मीटर (६२५ फूट) उंचीवरून मिळाला. ही भीषण दुर्घटना अहमदाबाद विमानतळापासून अवघ्या ०.९ नॉटिकल मैलांवर घडली. उड्डाणानंतर दोन्ही इंजिनांचे फ्युएल कटऑफ स्विच एका सेकंदाच्या फरकाने ‘रन’वरून ‘कटऑफ’वर गेले आणि इंजिन बंद पडली. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून मिळालेल्या माहितीनुसार वैमानिकांमध्ये गोंधळ दिसून आला. या संवादातून अचानकपणे घडलेल्या तांत्रिक बिघाडाचा अंदाज येतो. त्यानंतर वैमानिकांनी इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, त्यात इंजिन-१ काहीसे सुरू झाले, पण इंजिन-२ बंदच राहिले. या दरम्यान रॅम एअर टर्बाइन ही आपत्कालीन यंत्रणा सक्रिय झाली. या लहान प्रोपेलरसारख्या उपकरणामुळे थोडी वीज आणि हायड्रॉलिक पॉवर मिळाली, पण ती अपघात टाळण्यासाठी पुरेशी ठरली नव्हती. विमान फक्त ३२ सेकंद हवेत होते.
अहवालात पुढे नमूद केले आहे की, ब्लॅक बॉक्समधील नोंदींनुसार टेकऑफ थ्रस्ट सक्रिय असतानाही थ्रस्ट लीव्हर्स पूर्णपणे तुटलेले होते. थ्रस्ट कंट्रोल सिस्टमशी त्यांचे कनेक्शन तुटले होते. विशेष बाब म्हणजे, फ्लाइट डेटा रेकॉर्डरनुसार थ्रॉटल लिव्हर टेकऑफ मोडवर होते, पण प्रत्यक्षात ते निष्क्रिय स्थितीत आढळले. त्यामुळे इंजिन नियंत्रण प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता तपासकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पक्षीधडकेचा कोणताही पुरावा आढळला नाही. घातपाताचाही कुठलाही पुरावा सापडला नाही. विमानाचे फ्लॅप सेटिंग आणि लँडिंग गिअर सामान्य स्थितीत होते. दोन्ही वैमानिक वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त होते आणि त्यांच्याकडे अनुक्रमे ८,२०० व १,१०० तासांचा अनुभव होता. दोन्ही वैमानिक आदल्या दिवशीच अहमदाबाद येथे आले होते. त्यांनी पुरेशी विश्रांती घेतली होती. उड्डाणापूर्वी त्यांची ब्रिद अॅनालायझर टेस्टही (मद्यपान चाचणी) झाली होती.
एएआयबीने स्पष्ट केले आहे की, हा अहवाल केवळ प्राथमिक स्वरूपाचा असून तपास अद्याप सुरू आहे. बोईंग किंवा इंजिन उत्पादक जनरल इलेक्ट्रिला सध्या कोणताही सल्ला अथवा तांत्रिक इशारा देण्यात आलेला नाही. थ्रॉटल लिव्हर्सच्या स्थितीतील विसंगती सध्या तपासाचा केंद्रबिंदू असून, मानवी चूक, तांत्रिक बिघाड किंवा सॉफ्टवेअर त्रुटी यांपैकी कोणता घटक कारणीभूत होता, हे अंतिम अहवालात स्पष्ट होईल.
अहवाल मान्य नाही!
पायलट असोसिएशन
एएआयबीच्या प्राथमिक अहवालावर एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, तपासाचा सूर आणि दिशा या अपघाताला वैमानिकाची चूक कारणीभूत असल्याचे संकेत देत आहे. आम्ही हे पूर्णपणे फेटाळतो. निष्पक्ष आणि तथ्य-आधारित चौकशी व्हावी, असा आमचा आग्रह आहे. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीशिवाय किंवा माहितीशिवाय हा अहवाल माध्यमांना लीक करण्यात आला आहे. तपासात पारदर्शकतेचा अभाव आहे. तो पूर्णपणे गुप्ततेने तयार केलेला आहे. यामुळे त्याची विश्वासार्हता कमी होते. पात्र, अनुभवी कर्मचाऱ्यांना, विशेषतः वैमानिकांना तपास पथकात समाविष्ट केलेले नाही.