न्यूझीलंड महिला खासदाराची एआय निर्मित नग्न फोटो

वेलिंग्टन – न्यूझीलंडच्या महिला खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी डीपफेकबाबत कायदा करण्याची मागणी संसदेत केली. डीपफेक डिजिटल हार्म अँड एक्सप्लॉयटेशन विधेयकाला पाठिंबा देत त्यांनी प्रसिद्ध झालेला स्वतःचा एआय निर्मित नग्न फोटो संसदेत दाखवला. असे कृत्रिम फोटो तयार करणे सोपे आहे आणि ते धोकादायक असू शकते हे लोकांना सांगण्याचा त्यांचा उद्देश होता. डीपफेक कायदा मंजूर झाला तर या कायद्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या संमतीशिवाय डीपफेक तयार करणे किंवा शेअर करणे गुन्हा असेल.
खासदार लॉरा मॅकक्लूर म्हणाल्या की, हा माझा नग्न फोटो आहे, पण तो खरा नाही. हे मला माहित असले तरी मला उभे राहून हा फोटो दाखवण्याची शरम वाटते. गुगल सर्चमधून सापडलेल्या वेबसाइटचा वापर करून अवघ्या काही क्षणात हा डीपफेक फोटो तयार झाला. समस्या तंत्रज्ञानाची नाही तर लोकांना त्रास देण्यासाठी त्याच्या होणाऱ्या गैरवापराची आहे. आपल्याला यावर मार्ग शोधावा लागेल. न्यूझीलंडमध्ये सध्या डिजिटल कम्युनिकेशन्सशी संबंधित काही नियम आहेत. परंतु डीपफेकचे थेट नियमन करणारे कोणतेही कायदे नाहीत. डीपफेक फोटो तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त एका बॉक्समध्ये टिक करून तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तुमच्याकडे फोटोमधील व्यक्तीची संमती असल्याचे नमूद करावे लागते. बहुतांश प्रकरणांमध्ये संमती घेतली जात नाही. लॉ असोसिएशनच्या मते ९० ते ९५ टक्के ऑनलाइन डीपफेक व्हिडिओ हे संमतीशिवाय असतात आणि अश्लील असतात. यापैकी सुमारे ९० टक्के व्हिडिओत महिला बळी ठरतात. डीपफेकशी संबंधित धमक्या किंवा सेक्सटॉर्शनमुळे पिडीत अनेक लोकांनी संपर्क साधून यामुळे मानसिक तणाव वाढल्याचे सांगितले. संमतीशिवाय केलेले डीपफेक हा स्पष्टपणे छळ आहे. यासंदर्भात कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, डीपफेक डिजिटल हार्म अँड एक्सप्लॉयटेशन कायदा डिजिटल हानी, शोषण, अश्लीलता आणि आक्षेपार्ह रेकॉर्डिंगशी संबंधित नियमांवर निर्बंध आणला जाईल .या विधेयकात हानिकारक डिजिटल सामग्री काढून टाकण्याची आणि पीडितांना भरपाई देण्याची तरतूद असेल. परवानगीशिवाय कोणाचाही फोटो किंवा व्हिडिओ वापरणे गुन्हा ठरेल.