Pulwama Encounter | जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातल्या नाडर त्राल (Nader Tral) भागात आज (15 मे) सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीनंतर दक्षिण काश्मीरच्या अवंतीपोरा परिसरात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.
चकमकीदरम्यान दोन दहशतवादी ठार झाले असून, आणखी 2 ते 3 दहशतवादी सैन्याच्या जाळ्यात अडकले असण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
काश्मीर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (X) हँडलवरून माहिती देत सांगितले की, “अवंतीपोराच्या नाडर त्राल भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी उपस्थित आहेत. अधिक तपशील लवकरच दिला जाईल.” एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मते, संशयित हालचाली पाहून सुरक्षा दलांनी आव्हान दिल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने (Chinar Corps of the Indian Army) ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “15 मे 2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर भारतीय लष्कर, काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने नाडर त्राल परिसरात संयुक्त ऑपरेशन सुरू केले. संशयास्पद हालचाली दिसल्यावर झालेल्या गोळीबारामुळे चकमक सुरू झाली.”
ही कारवाई मंगळवारी शोपियान (Shopian) जिल्ह्यात झालेल्या मोठ्या चकमकीनंतर अवघ्या दोन दिवसांत घडली आहे. ‘ऑपरेशन केलर’ (Operation Keller) अंतर्गत केलरच्या शुक्रू जंगल परिसरात लष्कर-ए-तैयबाचेतीन दहशतवादी ठार करण्यात आले. यामध्ये लष्करचा टॉप कमांडर शाहिद कुट्टाय याचा समावेश होता. तसेच अदनान शफी याचीही ओळख पटली आहे. तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप झालेली नाही.
कुट्टायने 2023 मध्ये दहशतवादी गटात प्रवेश केला होता. तो ‘A’ श्रेणीतील दहशतवादी म्हणून ओळखला जात होता. 22 एप्रिल रोजी पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने 26 एप्रिल रोजी कुट्टायचे घर जमीनदोस्त केले होते.
‘ऑपरेशन केलर’ ही भारतीय लष्कराने सुरू केलेली कारवाई ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) चा भाग आहे, जी पाकिस्तानच्या मदतीने सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्ध चालवली जात आहे. ऑपरेशन सिंदूरची सुरुवात 7 मे रोजी झाली होती. शोपियानमध्ये सुरू असलेल्या या लष्करी कारवाईमुळे दहशतवादी गटांना मोठा झटका बसला आहे.