Home / देश-विदेश / मोदी-जिनपिंग यांच्यात चीनमध्ये 50 मिनिटे चर्चा

मोदी-जिनपिंग यांच्यात चीनमध्ये 50 मिनिटे चर्चा

तियानजिन- पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल सात वर्षांनी दोन दिवसांच्या चीन दौर्‍यावर जात आज चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बातचीत केली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर 50 मिनिटे चर्चा झाली. लडाखच्या गलवान खोर्‍यात दोन्ही देशातील सैन्यांमध्ये संघर्ष झाल्यानंतर द्विपक्षीय संबंध ताणले गेले होते. यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशीही पंतप्रधानांची बातचीत होणार आहे.

या भेटीनंतर मोदी म्हणाले, गेल्यावर्षी कजानमध्ये आमच्यामध्ये खूप मोलाची चर्चा झाली होती. त्यामुळे द्विपक्षीय संबंध उत्तम झाले. सीमेवर सैनिकांच्या माघारीनंतर शांतता आणि स्थैर्याचे वातावरण तयार झाले आहे. विशेष प्रतिनिधींच्या माध्यमातून सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यात आला. कैलाश मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे.
दोन्ही देशांतली थेट विमानसेवाही पूर्ववत करण्यात आली आहे. चिनी अध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले, की पंतप्रधान मोदींना भेटून आनंद झाला. ड्रॅगन (चीन) आणि हत्ती (भारत) यांनी एकत्र आले पाहिजे. दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि चीन यांच्यातल्या सहकार्याचा 2.8 अब्ज लोकांना लाभ होईल. यातून संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होईल. परस्पर विश्वास आणि सन्मान यांच्या आधारावर द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. जून 2020 मध्ये गलवान खोर्‍यातील लष्करी संघर्षामुळे द्विपक्षीय संबंध खराब झाले होते. पंतप्रधानांच्या या दौर्‍याच्या निमित्ताने ताणलेल्या द्विपक्षीय संबंधात सलोखा निर्माण करण्याचे काम झाले. पंतप्रधानांचा हा दौरा तियानजिन येथील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भरमसाट कर लावून संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला धक्के दिले. त्या पार्श्वभूमीवर चीनने या शिखर परिषदेचे भव्य असे आयोजन केले आहे. शांघाय शिखर परिषदेत 26 देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार असून या देशांची लोकसंख्याच्या जगाच्या 40 टक्के एवढी आहे.

रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लावला आहे. याच अनुषंगाने या परिषदेवेळी रशियन अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासोबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी बातचीत करणार आहेत.