रशियात शक्तिशाली भूकंप! त्सुनामी! जपान ते अमेरिका घबराटीची लाट

Powerful earthquake in Russia! Tsunami! Wave of panic from Japan to America

मॉस्को- रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पाजवळ आज सकाळी 8.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. हा भूकंप जगातील सहाव्या क्रमांकाचा मोठा भूकंप होता. या तीव्र धक्क्‌‍यांमुळे समुद्रात तब्बल 12 मीटर उंच लाटा उसळल्या. या भूकंपाने मोठे नुकसान घडवले. जपानमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. तातडीच्या उपाययोजनांमुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या भूकंपामुळे रशियासह जपान, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंडमध्येही भीतीची लाट उसळली.
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण नुसार, भारतीय वेळेनुसार पहाटे 4.54 वाजता झालेल्या या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 19.3 किलोमीटर खोलीवर होते. भूकंपानंतर कामचटकाच्या किनारी भागात सुमारे 4 मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा उसळल्या. त्यामुळे अनेक इमारती आणि घरांचे नुकसान झाले आहे. एका बालवाडीचे नुकसान झाले आहे. काही घरांचे छप्पर कोसळले. रशियाच्या कुरिल बेटे आणि कामचत्काच्या किनारी भागांना भूकंपानंतर काही वेळातच त्सुनामीच्या उंच लाटांनी जोरदार तडाखा दिला. कुरिल द्वीपसमूहातील मुख्य शहर सेव्हेरो-कुरिल्स्क येथे त्सुनामीची पहिली लाट पोहोचल्याची माहिती स्थानिक राज्यपाल वलेरी लिमारेन्को यांनी दिली. त्यामुळे रहिवाशांना उंच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. इथल्या बंदरातील अनेक जहाजे समुद्रात वाहून गेली. विद्युत ग्रीड कोलमडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये समुद्राचे पाणी शहरात घुसल्याचे, गाड्या वाहून जात असल्याची आणि घरांचे नुकसान झाल्याची दृश्ये दिसली. यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली.
भूकंपानंतर त्सुनामीचा धोका लक्षात घेऊन रशियन प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. किनारी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असले तरी, प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली. आपत्कालीन सेवांना सतर्क करण्यात आले.
रशियातील या भूकंपाचे पडसाद संपूर्ण प्रशांत महासागर क्षेत्रात उमटले. जपान, न्युझीलंड, अमेरिका, कॅनडा या देशांनाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला. चीन, फिलीपिन्स, इंडोनेशिया, न्यूझीलंड, पेरू आणि मेक्सिकोनेही त्यांच्या किनारी भागात त्सुनामीचा इशारा जारी केला. जपानमधील सोसा सिटी येथील कुजुकुरी किनाऱ्यावर लाटा आदळताना दिसल्या. जपानच्या दक्षिणेकडील होक्कायडो किनाऱ्यावर 4.3 फूट उंचीची त्सुनामीची लाट नोंदवली गेली. टोकियोमधील सुमारे 20 लाख लोकांना घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच एक दिवसांपेक्षा अधिक काळ त्सुनामी लाटा उसळू शकतात, असाही इशारा देण्यात आला आहे. तोहोकू, चिबा आणि ओसाका भागात सायरन वाजवून देण्यात आला. या आपत्तीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हवाईमधील सर्व बंदरे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर त्सुनामीच्या लाटा धडकल्या.
कॅलिफोर्नियातील अरेना कोव्ह येथे दीड फूट उंचीच्या लाटा नोंदवण्यात आल्या. संपूर्ण कॅलिफोर्निया राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. कामचटका परिसरात याआधी 1952 मध्ये 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता. सध्याचा भूकंप तेवढ्याच तीव्रतेचा असल्याचे भूकंपतज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्याच्या काळात कामचटका भागातील हा सहावा भूकंप आहे. काही आठवड्यांपूर्वी इथे 7.4 तीव्रतेचा धक्का बसला होता.