राहुल गांधींनी यावेळी पुरावेच दिले! मतांची चोरी! एकाचे अनेक केंद्रांत-अनेक राज्यांत मतदान

Rahul Gandhi gave evidence this time! Vote theft One person voting in many centers-many states


नवी दिल्ली- भाजपावर ईव्हीएम घोटाळ्याचा वारंवार आरोप करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगानेच दिलेल्या मतदार याद्यांचा आधार घेत त्यामध्ये करण्यात आलेल्या गैरप्रकारांचा पुराव्यानिशी पर्दाफाश केला. एकेका मतदाराने एकाहून अनेक मतदान केंद्रांवर आणि एकाहून अनेक राज्यांमध्ये अनेकदा मतदान केल्याची उदाहरणे निवडणूक आयोगानेच दिलेल्या यादीतून शोधून काढून राहुल गांधी यांनी माध्यमांसमोर मांडली. तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी नरेंद्र मोदी यांना लोकसभेच्या 25 जागांची गरज होती. यासाठी बोगस मतदार, बनावट नावे, बनावट पत्ते असे प्रकार करण्यात आले. भाजपाच्या या कृष्णकृत्यामध्ये निवडणूक आयोग सामील असून, भाजपा आणि निवडणूक आयोग मिळून देशातील लोकशाहीच संपवण्याच्या प्रयत्नात आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आमच्या महाविकास आघाडीचा दणदणीत विजय होतो आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र आमची पुरती वाताहात होते, हे कसे काय शक्य झाले, असा सवाल राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला. महाराष्ट्रात अवघ्या पाच महिन्यांत मतदारांच्या संख्येत त्याआधीच्या पाच वर्षांत झाली नव्हती एवढी प्रचंड वाढ कशी काय झाली, असा सवालही राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विचारला.
निवडणूक आयोगावर पक्षपातीपणा आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या कारस्थानामध्ये सहभागी असल्याचा आरोप करताना राहुल गांधी यांनी काही उदाहरणे सांगितली. ते म्हणाले की, आम्हाला नुसता संशय नव्हे तर खात्रीच झाली होती की, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्याची मदत करत आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे एकेका मतदारसंघातील मतदार याद्या डिजिटल स्वरूपात मागितल्या. त्या देण्यास आयोगाने नकार दिला. कारण याद्यांमध्ये केलेला घोटाळा आयोगाला लपवायचा होता. आम्ही आयोगाकडे शेकडो वेळा पाठपुरावा केला. पण आयोग मतदार याद्या डिजिटल स्वरूपात द्यायला तयार झाला नाही. मग आम्ही कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतील केवळ बंगळुरूवर लक्ष केंद्रित केले. बंगळुरुमधील 7 मतदारसंघांपैकी 6 मतदार संघांमध्ये भाजपाचा पराभव झाला. पण महादेवपुरा या एका मतदारसंघात भाजपाला भरभरून मते मिळाली. हे असे का झाले हे तपासण्यासाठी आम्ही महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या आयोगाकडे मागितल्या. आयोगाने या याद्या डिजिटल स्वरूपात न देता छापील स्वरुपात दिल्या. याद्यांचा हा ढीग 7 फूट उंच आणि कित्येक किलो वजनाचा होता. हेतू हा की, एवढ्या प्रचंड कागदपत्रांमधून आम्हाला घोळ शोधून काढता येऊ नये. पण आम्ही त्यावरही तोडगा काढला. आम्ही या सर्व मतदार याद्यांची छाननी करण्यासाठी कार्यकर्त्यांची फौजच कामाला लावली. तरीही आम्हाला एका मतदारसंघातील मतदार याद्यांची छाननी करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागला. पण त्यातून जे सत्य बाहेर आले ते अत्यंत धक्कादायक आहे. निवडणूक आयोगानेच दिलेल्या या यादीतून आम्हाला असे आढळून आले की, महादेवपुरा मतदारसंघात 1 लाख 250 मतदार बोगस आहेत. मतदारांचे बोगस छायाचित्र, बनावट पत्ते, एकेका घरात 80 हून अधिक मतदार, छायाचित्रच नसणे आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांसाठी असलेल्या अर्ज क्र. 6 मधील हेराफेरी अशा पाच प्रकाराने मतांची चोरी करण्यात आली. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांच्या यादीतील मतदारांचे वय 80, 85, 65 असे नोंदवलेले आहे. या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या काही प्रश्नांना उत्तरेही दिली. निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये केलेला घोळ तुम्ही पुराव्यानिशी उघड करत आहात तर यावर पुढे जाऊन तुम्ही काय कृती करणार आहात, असा प्रश्न विचारला असता, देशातील लोकशाहीच संपवायला निघालेल्या भाजपाला आणि त्याला या अतिशय गंभीर गुन्ह्यात मदत करणाऱ्या निवडणूक आयोगाला त्यांच्या कृत्यांची फळे एक ना एक दिवस नक्कीच भोगावी लागतील, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले.
राहुल गांधी खोटे बोलतात
फडणवीसांचा पलटवार

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले की, राहुल गांधी धडधडीत खोटे बोलत आहेत. त्यांच्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व आता नष्ट झाल्यात जमा आहे. त्यामुळे ते वारंवार असे खोटे आरोप करत आहेत. मतदार याद्यांमध्ये कसलाही घोळ झालेला नाही. खरेतर राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप हरवली आहे. त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे.
काँग्रेस पक्ष महाराष्ट्र, बिहारच नव्हे तर कुठल्याही राज्यात आता निवडून येणार नाही, हे राहुल गांधींना पक्के समजले आहे. म्हणूनच ते निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांवर आरोप करत आहेत. जेणेकरून लोकांचा या संस्थांवरून विश्वास उडावा, देशात अराजक माजावे अशी त्यांची इच्छा आहे.
एकीकडे मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे बिहारमध्ये निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष सखोल पुनर्परिक्षणाला विरोध करत आहेत. त्यांना जर मतदार याद्यांमध्ये सुधारणा करायची आहे, तर मग ते पुनर्परिक्षणाला विरोध का
करत आहेत.