नवी दिल्ली- संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून, ते 21 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला सत्ताधारी व विरोधक अशा 51 पक्षांच्या 54 खासदारांची उपस्थिती होती. त्यात भाजपासह विरोधी पक्षातील काँग्रेस, आप, समाजवादी पक्ष, शरद पवार गट, उबाठाचे खासदार हजर होते. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार उपस्थित नव्हते.
राज्यसभेचे सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा (J.P. Nadda) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या खासदारांनी आपापली मते मांडली. सरकारच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी अधिवेशनाची रूपरेषा स्पष्ट केली. अधिवेशनात कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रिजिजू म्हणाले की, सरकार कोणत्याही मुद्यापासून पळ काढणार नाही. आम्ही ऑपरेशन सिंदूरसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासही तयार आहोत. आम्ही नियम आणि संसदीय परंपरांना महत्त्व देतो. सभागृहाचे कामकाज योग्यरित्या चालावे यासाठी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये समन्वय असला पाहिजे.
विरोधक या अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याच्याशी संबंधित तपास, ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प यांचा युद्धबंदीचा दावा, एअर इंडिया विमान अपघात, मणिपूर हिंसाचार, न्या. यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग यासारखे मुद्दे उपस्थित करणार आहे. ऐन अधिवेशनाच्या काळात 23 ते 26 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान परदेशात कसे जातात, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. यावर केंद्रीय मंत्री रिजिजू म्हणाले की, महत्त्वाच्या मुद्यांवर पंतप्रधान नेहमी संसदेत उपस्थित राहतात.
या अधिवेशनात सरकार 17 विधेयके मांडणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक, राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक सुधारण विधेयक, मणिपूर जीएसटी दुरुस्ती विधेयक, सार्वजनिक विश्वस्त (सुधारणा) विधेयक, भारतीय व्यवस्थापन संस्था (सुधारणा) विधेयक, भूवारसा स्थळे आणि भूअवशेष (संवर्धन आणि देखभाल) विधेयक, भारतीय बंदरे विधेयक यांचा समावेश आहे.
अजित पवारांचे खासदार अनुपस्थित
केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीला महाराष्ट्रातून शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे, शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे आणि उबाठाकडून अरविंद सावंत उपस्थित होते. मात्र, अजित पवार यांच्या गटातील कुणीही या बैठकीला उपस्थित नव्हते. बीडमधील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे खासदार सुनील तटकरे अनुपस्थित राहिल्याची माहिती आहे. तर प्रफुल्ल पटेलही हेही दिल्लीत नसल्याने बैठकीला उपस्थित नव्हते.
