India’s All-Party Delegation to Brief World on Pak Conflict | पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर कठोर राजनयिक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सात सर्वपक्षीय खासदार शिष्टमंडळांची घोषणा केली असून ही शिष्टमंडळे उच्चस्तरीय राजनयिक मोहिमेवर भारताचे प्रतिनिधित्व करतील.
संसदीय कामकाज मंत्रालयाच्या माहितीनुसार, या मोहिमेचा उद्देश भारताच्या ‘शून्य सहनशीलते’च्या धोरणाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवणे हा आहे. तसेच, ही शिष्टमंडळे ऑपरेशन सिंदूरनंतरची भारताची भूमिका व पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा देण्याबाबतची भूमिका जगभरातील देशात जाऊन मांडणार आहे.
मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, “ही शिष्टमंडळे दहशतवादाविरुद्ध भारताचा कठोर आणि एकमताचा दृष्टिकोन जगापर्यंत पोहोचवतील.” या सात शिष्टमंडळांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, खासदार व वरिष्ठ राजनयिकांचा समावेश असेल.
सात शिष्टमंडळांचे नेतृत्व करणारे खासदार:
- शशी थरूर (Shashi Tharoor) – काँग्रेस
- रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) – भाजप
- संजय कुमार झा (Sanjay Kumar Jha) – जेडीयू
- बैजयंत पांडा (Baijayant Panda) – भाजप
- कनिमोझी करुणानिधी (Kanimozhi Karunanidhi) – डीएमके
- सुप्रिया सुळे (Supriya Sule) – राष्ट्रवादी काँग्रेस
- श्रीकांत एकनाथ शिंदे (Shrikant Eknath Shinde) – शिवसेना
रिपोर्टनुसार, या मोहिमेत सुमारे 40 बहुपक्षीय खासदार सहभागी होणार असून, ते 7 गटांमध्ये विभागून 4 ते 5 देशांना भेट देतील. ही दौरे 23 मे पासून सुरू होऊन 10 दिवस चालणार आहेत. शिष्टमंडळे United States, United Kingdom, United Arab Emirates, South Africa आणि Japan यांसारख्या प्रमुख जागतिक राजधानींना भेट देतील.
हे शिष्टमंडळ विशेषतः पाकिस्तानकडून होणाऱ्या काश्मीर (Kashmir) आणि सीमापार दहशतवादावरील (cross-border terrorism) भारताच्या धोरणाची माहिती जागतिक समुदायाला देणार आहेत.
या अभियानाचे नेतृत्व करणारे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी सांगितले, “हे केवळ राजकारणाच्या पलीकडचे नाही, तर राष्ट्रीय एकतेचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे मित्र राष्ट्रांना भेटून भारताचा संदेश घेऊन जातील.”
ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ला:
या मोहिमेची पार्श्वभूमी ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असून, 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam terror attack) 26 लोक ठार झाले होते. त्यानंतर 7 मे रोजी भारताने पाक व पीओकेमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
यानंतर पाकिस्तानकडून सीमापार गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न झाले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील रडार स्टेशन्स, हवाई तळ आणि संपर्क केंद्रांवर हल्ले केले.