Home / देश-विदेश / आधार नागरिकत्वाचा पुरावा नाही! निवडणूक आयोगाची भूमिका योग्य; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

आधार नागरिकत्वाचा पुरावा नाही! निवडणूक आयोगाची भूमिका योग्य; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

Supreme Court

नवी दिल्ली – आधार कार्ड (Aadhaar Card) हा नागरिकत्वाचा ठोस पुरावा मानता येत नाही, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले. आधार कार्ड हा नागरिकत्वाचा परिपूर्ण पुरावा नाही. आधार कार्डची स्वतंत्रपणे पडताळणी करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने सांगितले.

बिहार(Bihar)मध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोर पुनरिक्षणाला (SIR) आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्या. सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्या. सूर्यकांत यांनी हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने बिहारमध्ये सुरू केलेल्या एसआयआरमुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे मतदार याद्यांमधून कमी केली जाण्याचा धोका आहे. विशेषतः ज्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करणे शक्य नाही, अशा लोकांची नावे मतदार याद्यांमधून वगळली जात आहेत. २००३ च्या मतदार यादीत नाव असलेल्या आणि घरचा पत्ता तोच असलेल्या मतदारांकडेही नव्याने कागदपत्रे मागितली जात आहेत,असे सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले.