Adani faces US scrutiny over Iran LPG ‘links’ | अब्जाधीश आणि भारतीय उद्योजक गौतम अदानी यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील अभियोजक (US prosecutors) उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांनी अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन करून इराणमधून पेट्रोकेमिकल उत्पादने आयात केली का? या संदर्भात चौकशी सुरू करत आहेत.
रिपोर्टनुसार, अदानी यांच्या कंपन्यांनी अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन करून इराणमधून पेट्रोकेमिकल उत्पादने मुंद्रा बंदरातून (Mundra port) भारतात आयात केली का? याची चौकशी करत असल्याचचे समोर आले आहे.
अदानी समूहाने या आरोपांचा स्पष्ट इन्कार केला असून, अमेरिकन अधिकाऱ्यांकडून कोणतीही चौकशी झालेली नसल्याचे सांगितले आहे. तसेच, कंपनीने इराणमधून एलपीजी (LPG) आयात करून निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा कोणताही सहभाग स्पष्टपणे नाकारला आहे.
‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या तपासात असे आढळले की अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेड (Adani Ports and SEZ Ltd) संचालित मुंद्रा बंदर आणि पर्शियन गल्फ (Persian Gulf) यामध्ये टँकरची नियमित हालचाल होती. हे टँकर निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या जहाजांशी साधर्म्य असलेली वैशिष्ट्ये दर्शवत असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यावर प्रतिक्रिया देताना अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises) प्रवक्त्याने सांगितले, “अदानी समूह कोणत्याही प्रकारे इराणच्या एलपीजीच्या व्यापारात सहभागी नाही, तसेच कोणत्याही निर्बंधांचे उल्लंघन करत नाही.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणच्या तेलाच्या किंवा पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या खरेदीवर पूर्ण बंदी आणण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या सरकारने विरोधी देशांशी व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर कठोर निर्बंध लादण्याची तयारी दर्शवली आहे.