Adnan Sami Slams Fawad Hussain | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे व्हिसाच्या माध्यमातून भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्वरित देश सोडावा लागणार आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी पाकिस्तानी मंत्री चौधरी फवाद हुसैन (Chaudhry Fawad Hussain) यांनी गायक अदनान सामींचा उल्लेख करत राष्ट्रीयत्वाबाबत सवाल केला होता. यावरून अदनान सामीने चौधरी फवाद हुसैन यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिल्यानंतर, फवाद हुसैन यांनी सामी यांना उद्देशून “त्यांना पण पाकिस्तानात परत पाठवले जाईल का?” असा सवाल केला होता.यावर प्रत्युत्तर देताना अदनान सामी यांनी फवाद हुसैन यांना “अडाणी मूर्ख” असे संबोधत जोरदार निशाणा साधला.
हुसैन यांच्या प्रश्नावर सामी यांनी ट्विट करत उत्तर दिले, “या निरक्षर मूर्खाला कोण समजावणार!” यानंतर वाद आणखी वाढला. फवाद हुसैन यांनी सामी लाहोरचे असल्याचे म्हटले. यावर सामी यांनी त्यांचा जन्म पेशावरमध्ये झाल्याचे स्पष्ट केले आणि फवाद यांना माजी माहिती मंत्री असूनही चुकीची माहिती पसरवल्याबद्दल देखील फटकारले.
“माझे मूळ पेशावरचे आहे, लाहोरचे नाही! विचार करा, तुम्ही माहिती मंत्री होता आणि तुम्हाला काही माहितीच नाही.”, असे ट्विट करत सामी यांनी फवाद यांना टोला लगावला.
दरम्यान, अदनान सामी यांनी डिसेंबर 2015 मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले होते आणि सध्या ते मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहतात. सामी यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून त्यांच्या पालकांचे मूळ पाकिस्तानात आहे. त्यांनी याआधी सांगितले होते की भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांना 18 वर्षे लागली आणि एक दीड वर्ष ते नागरिकत्वाविना होते.