दिल्लीत विमानाचे लँडिंग होताच पायलटचा मृत्यू, नुकतेच झाले होते लग्न; नक्की काय घडले?

Air India Express Pilot Death | नुकतेच लग्न झालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या (Air India Express) 28 वर्षीय पायलटचे (pilot) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिल्तील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली आहे.

श्रीनगर-दिल्ली विमान उतरल्यानंतर पायलट विमानतळावर औपचारिकता पूर्ण करत असताना अचानक हृदयविकाराच्या झटका आला. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर ही घटना घडली. एअर इंडिया एक्सप्रेसकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

विमान उतरल्यानंतर अचानक पायलटला त्रास होऊ लागला. त्याला उलट्या झाल्या, तसेच बेशुद्ध झाला. त्यानंतर पायलटला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. या पायलटचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.

एअर इंडिया एक्सप्रेसने याबाबत माहिती देताना सांगितले की, “एका मौल्यवान सहकाऱ्याचे वैद्यकीय कारणांमुळे झालेले निधन अत्यंत दुःखद आहे. या कठीण प्रसंगी आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. आम्ही त्यांना या अपार दुःखातून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहोत.”

कंपनीकडून पुढे असेही आवाहन करण्यात आले की, “सर्वांनी गोपनीयतेचा आदर करावा आणि अनावश्यक तर्कवितर्क टाळावेत. योग्य अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करण्यात आम्ही कटिबद्ध आहोत.”

दरम्यान, वैमानिकांच्या कामाच्या वेळा आणि विश्रांतीच्या धोरणांबाबत (pilot duty hours) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) नवीन कृती आराखडा सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर हा दुर्दैवी प्रकार उघड होताच वैमानिकांच्या थकव्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.