Ajay Kumar | UPSC चे नवीन अध्यक्ष अजय कुमार कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती

UPSC New Chairman Ajay Kumar

UPSC New Chairman | केंद्र सरकारने माजी संरक्षण सचिव अजय कुमार (Ajay Kumar) यांची संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. कार्मिक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केला असून, केंद्र सरकारच्या या निर्णयाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मंजुरी दिली आहे.

कोण आहेत यूपीएससीचे नवे अध्यक्ष अजय कुमार?

अजय कुमार हे १९८५ च्या बॅचचे निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी संरक्षण मंत्रालयात सचिव म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. तिथे त्यांनी संरक्षण उत्पादन विभागाचे सचिवपदही भूषवले होते. अजय कुमार यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे महासंचालक यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

विशेष म्हणजे, २०१४ मध्ये डिजिटल इंडिया (Digital India) उपक्रम लागू करणाऱ्या टीममध्ये त्यांचा समावेश होता. या उपक्रमात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, आधार, MyGov.in, गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) आणि जीवन प्रमाण यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा समावेश होता. माजी संरक्षण सचिव म्हणून अजय कुमार यांनी २०० वर्षे जुन्या आणि ८०,००० कर्मचारी असलेल्या आयुध निर्माणी मंडळाच्या निगमीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

यूपीएससी अध्यक्षांची नियुक्ती कशी होते?

संविधानाच्या अनुच्छेद ३१६(१) नुसार, यूपीएससीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. अध्यक्षांचे पद रिक्त झाल्यास किंवा ते कोणत्याही कारणास्तव आपले कर्तव्य पार पाडू शकत नसल्यास, राष्ट्रपती आयोगाच्या इतर सदस्यांपैकी एकाला तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकतात. यूपीएससी अध्यक्षांचे मासिक वेतन २.५ लाख रुपये असते, तर यूपीएससी सदस्यांचे वेतन २.२५ लाख रुपये प्रति महिना असते.

यूपीएससी अध्यक्षांच्या नियुक्तीच्या अटी:

नियुक्तीच्या वेळी, आयोगाच्या किमान निम्म्या सदस्यांनी भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत किमान दहा वर्षे सेवा केलेली असावी. यूपीएससी सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो, यापैकी जे आधी असेल ते लागू होते. त्यांच्या सेवाशर्ती यूपीएससी (सदस्य) नियम, १९६९ नुसार असतात. कार्यकाळ संपल्यानंतर, कोणताही सदस्य त्याच पदावर पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतो. नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी, सरकार अनेकदा वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ञांचा समावेश असलेली निवड समिती स्थापन करते.

दरम्यान, यूपीएससी नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा २०२५ देशभरात २५ मे रोजी होणार आहे. संघ लोक सेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ साठी प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. यशस्वीरित्या नोंदणी केलेले उमेदवार त्यांचे सीएसई प्रिलिम्स प्रवेशपत्र २०२५ हे upsc.gov.in या वेबसाइटवरून ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.