ISRO | भारताने अंतराळ क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. या यशस्वी मोहिमेचे कौतुक अमेरिकेतील कंटेंट क्रिएटर क्रिस्तन फिशर यांनी इन्स्टाग्रामवरील एका व्हायरल व्हिडिओद्वारे केले आहे.
त्यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इस्रोच्या यशाचा जागतिक गौरव
क्रिस्तन फिशर यांनी आपल्या व्हिडिओत इस्रोच्या प्रभावी कामगिरीवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “भारताने आपला पहिला अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वीपणे पाठवला आहे. पण याशिवाय इस्रोने अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत.” त्यांनी 1969 मध्ये स्थापन झालेल्या इस्रोला जगातील सहा प्रमुख अंतराळ संस्थांपैकी एक असल्याचे नमूद केले. “मंगलयान मोहीम ही भारताची पहिली आंतरग्रहीय मोहीम होती आणि ती केवळ 74 दशलक्ष डॉलर्समध्ये यशस्वी झाली, तर नासाच्या पहिल्या मंगळ मोहिमेचा खर्च एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होता,” असे त्यांनी सांगितले.
फिशर यांनी भारताच्या कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवर भर दिला. “मंगळावर पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणारा भारत हा पहिला देश आहे. याशिवाय, 2008 मधील चांद्रयान-1 मोहिमेने चंद्रावर पाण्याचे रेणू शोधले, ज्याला नंतर नासानेही दुजोरा दिला,” असे त्या म्हणाल्या. इस्रोने एकाच मोहिमेत सर्वात हलका उपग्रह आणि सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा जागतिक विक्रमही नोंदवला आहे.
26 जून रोजी ‘ॲक्सिओम-4’ मोहिमेअंतर्गत ‘ड्रॅगन’ अंतराळयान 28 तासांच्या प्रवासानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडले गेले. या मोहिमेत ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी मिशन पायलट म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली. ते अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिट्सन आणि अन्य दोन क्रू मेंबर्ससोबत ISS वर पोहोचले. ही भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेतील (Human Spaceflight) एक मोठी झेप आहे.
फिशर यांच्या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “भारताचा अंतराळ कार्यक्रम इतका प्रभावी आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का? भारत नक्कीच एक प्रमुख अंतराळ शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे.” त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.