‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही तर…’, असदउद्दीन ओवैसींनी भारत-पाक सामन्यावर मांडली भूमिका, म्हणाले…

Asaduddin Owaisi on Ind vs Pak Match

Asaduddin Owaisi on Ind vs Pak Match: नुकतेच आगामी आशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धेची (Ind vs Pak Asia Cup 2025) घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदउद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी या वादात उडी घेतली असून, लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी या सामन्याचा विरोध केला.

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर असा सामना (Asaduddin Owaisi on Ind vs Pak Match) खेळणं किंवा पाहणं योग्य वाटत नसल्याचे मत असदउद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केले.

ओवैसींच्या टीकेचा सूर

लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील विशेष चर्चेदरम्यान ओवैसी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सरकारला प्रश्न विचारले की, “जेव्हा पाकिस्तानच्या विमानांना आपली हवाई हद्द ओलांडता येत नाही, व्यापार थांबवला जातो, पाणीपुरवठाही रोखला जातो, तेव्हा क्रिकेट सामना कसा काय खेळू शकतो? जर आपण ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही’ असं म्हणत असू, तर क्रिकेटच्या निमित्ताने संबंध कसे काय ठेवता येतील?”

ते पुढे म्हणाले, “तो सामना पाहण्यास माझी विवेकबुद्धी मला परवानगी देत नाही.” ओवैसींनी सरकारवर टीका करताना म्हटलं की, “पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांना सरकार काय सांगणार? की आम्ही बदला घेतला आणि आता तुम्ही सामना पाहा?”

आशिया कप 2025 चे वेळापत्रक

आशिया कप 2025 चा गट स्तरावरील भारत-पाकिस्तान सामना 14 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, आठ देशांमध्ये सामने होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ‘सुपर फोर’मध्ये पोहोचण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे अंतिम फेरीतही त्यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे.

एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले आहे. व्यापार थांबवला आहे. अशात, आशिया कप स्पर्धेत दोन्ही संघ आमनेसामने येणार असल्याने टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी यावरून बीसीसीआय आणि भारत सरकारवर निशाणा साधला आहे.