Ban on Pakistani Content on OTT | माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting – I&B) भारतातील सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, डिजिटल स्ट्रीमिंग सेवा आणि मध्यस्थांना पाकिस्तानमधून तयार होणारे सर्व वेब सिरीज , चित्रपट , गाणी, पॉडकास्ट आणि इतर कोणत्याही मीडिया कंटेंट त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी जारी केलेले हे निर्देश सब्सक्रिप्शन आधारित (Subscription-based) आणि विनामूल्य (Free-to-access) अशा दोन्ही प्रकारच्या प्लॅटफॉर्म्सना लागू असतील. त्यामुळे आता भारतातील नागरिकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आलेला कंटेंट पाहता येणार नाही.
भारताने 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) दिलेले प्रत्युत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणारी गोळीबारी या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या सीमा तणावाच्या (Border Tensions) पार्श्वभूमीवर हे निर्देश आले आहेत.
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी, भारतातील सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आणि मध्यस्थांना पाकिस्तानातून तयार झालेले वेब-सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर स्ट्रीमिंग मीडिया कंटेंट, ते सब्सक्रिप्शन आधारित मॉडेलवर किंवा इतर कोणत्याही प्रकारे उपलब्ध असोत, त्वरित थांबवण्याचे निर्देश देण्यात येत आहे.”
पाकिस्तानमधून उगम पावणाऱ्या मजकूर आणि इतर दृकश्राव्य तपशिला बाबत मार्गदर्शक सूचना
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) May 8, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा *ऐरणीवर* आहे. या पार्श्वभूमीवर ओटीटी माध्यमांनी पाकिस्तानातून उगम पावणारा मजकूर आणि इतर दृकश्राव्य तपशिल तत्काळ हटवणे अनिवार्य केले आहे https://t.co/vN5ZwMVoek
याआधी पाकिस्तानी कलाकार व नेत्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट व युट्यूब चॅनेल्सवर देखील भारतात बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये, पाकिस्तानी कंटेंटने डिजिटल वितरणाद्वारे भारतात एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग तयार केला होता. झी5 सारख्या भारतीय प्लॅटफॉर्म्सवर पाकिस्तानी मालिकांना मोठी लोकप्रियता मिळाली होती.
बोल, खुदा के लिए, केक आणि लाल कबूतर यांसारख्या पाकिस्तानी चित्रपटांनीप्राइम व्हिडिओआणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्म्सवर भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोच मिळवली होती. पाकिस्तानी कलाकारांची गाणी देखील विशेष प्रसिद्ध झाली होती. मात्र, आता सरकारने हा सर्व कंटेंट प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत.