India Bangladesh bilateral ties : भारत आणि बांगलादेशमधील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत नाजूक वळणावर असून त्याचे परिणाम थेट व्हिसा सेवांवर होताना दिसत आहेत. नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाने आपल्या सर्व व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. केवळ दिल्लीच नव्हे, तर त्रिपुरातील अगरतळा आणि पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथेही बांगलादेशच्या व्हिसा सेवा सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
नेमके काय घडले?
रिपोर्टनुसार, नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर 20 ते 25 तरुणांनी निदर्शने केली होती. बांगलादेशात हिंदू व्यक्ती ‘दिपू चंद्र दास’ यांची झालेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी हे तरुण एकत्र आले होते. या आंदोलनानंतर सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने व्हिसा सेवा थांबवल्या आहेत. दिल्ली आणि अगरतळा येथील दूतावासांनी ‘अपरिहार्य कारणास्तव’ सेवा बंद केल्याच्या नोटीस प्रसिद्ध केल्या आहेत.
तणावाचे मुख्य कारण काय?
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून कट्टरपंथी विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर भारतविरोधी वातावरण तापले आहे. हादीचा ढाका येथे गोळीबारात मृत्यू झाला होता. यानंतर बांगलादेशातील काही नेत्यांनी हादीचे मारेकरी भारतात पळून गेल्याचा दावा केला होता, जो भारताने फेटाळून लावला आहे.
या तणावामुळे बांगलादेशातील चितगाव, ढाका आणि राजशाही येथील भारतीय दूतावासाबाहेरही हिंसक निदर्शने झाली होती, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही तिथे आपल्या सेवा मर्यादित केल्या होत्या.
शेख हसीना सरकार कोसळल्यानंतरचे चित्र
बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर आणि मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेत आल्यापासून भारत-बांगलादेश संबंध ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हल्ले आणि राजनैतिक दूतावासांवरील निदर्शनांमुळे दोन्ही देशांतील अविश्वास अधिकच वाढला आहे.
सध्या व्हिसा सेवा बंद झाल्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी किंवा व्यवसायासाठी भारतात येणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची आणि बांगलादेशात जाणाऱ्या भारतीयांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा – Sudhir Mungantiwar : ‘मंत्रिपद नाही म्हणून हरलो असं नसतं’; मुनगंटीवारांच्या घरच्या आहेरावर बावनकुळेंचे थेट उत्तर









