Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने सिंधू नदी करार (Indus Waters Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी भारताला कठोर इशारा दिला आहे.
एका जाहीर सभेत बोलताना भुट्टो-झरदारी म्हणाले, “मी भारताला सांगू इच्छितो की सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर यातून आमचे पाणी वाहील किंवा त्यांचे रक्त.”
त्यांनी भारतावर अंतर्गत सुरक्षा अपयशावरून लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तानला पहलगाम हल्ल्यासाठी बळीचा बकरा बनवल्याचा आरोपही केला. त्यांचे हे वक्तव्य भारताने इस्लामाबादसोबतचे राजनैतिक संबंध कमी करणे, पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना बाहेर काढणे, सिंधू नदी करार थांबवणे आणि अटारी भू-मार्ग बंद करणे यांसारख्या अनेक राजनैतिक आणि आर्थिक उपाययोजना सुरू केल्यानंतर काही दिवसांनी आले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात २६ नागरिक मारले गेले, ज्यात अनेक पर्यटक होते. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पाकिस्तानात या कराराच्या निलंबनामुळे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि भुट्टो-झरदारी यांच्यात तातडीची बैठक झाली. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सरकार वादग्रस्त कालवा प्रकल्पाचाही पुनर्विचार करत आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदी करार (IWT) निलंबित करण्याबाबतच्या अलीकडील वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
भुट्टो-झरदारी यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणाच्या पार्श्वभूमीवर पुरी यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
भुट्टो-झरदारी यांच्या वक्तव्याला उत्तर देताना पुरी म्हणाले, “मी त्यांचे वक्तव्य ऐकले. त्यांना पाण्यात कुठेतरी उडी मारायला सांगा. पाणी नसेल तर ते कसे मारणार? अशा वक्तव्यांना महत्त्व देऊ नका. त्यांना समजेल.”
“पहलगाम घटना ही शेजारील देशाने घडवून आणलेला सीमापार दहशतवादी हल्ला आहे आणि ते जबाबदारी घेत आहेत. पूर्वीसारखे काहीही होणार नाही. पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणे, पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल आणि ही फक्त सुरुवात आहे. दहशतवादी जीवनाचा मूलभूत अधिकार हिरावून घेतात. संपूर्ण जग याचा निषेध करत आहे. पाकिस्तान हे केवळ एक बेईमान राष्ट्र नाही, तर ते अंतिम घटकेला पोहोचलेले राष्ट्र आहे,” असेही ते म्हणाले.