Amit Shah Retirement Plans | राजकीय नेते कधीच निवृत्त होत नाही असे म्हटले जाते. राजकारणातून निवृत्त होण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसले तरीही एकाक्षणी राजकीय कारकीर्द अनेकांना सोडावीच लागते. आता केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी निवृत्तीनंतरचे (Retirement Plans) आपली योजना सांगितली आहे.
राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातील महिला आणि कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी ते निवृत्तीनंतर काय करणार याबाबत सांगितले. ते म्हणाले की, “निवृत्तीनंतर मी माझे उर्वरित आयुष्य वेद, उपनिषद आणि नैसर्गिक शेतीला समर्पित करेन.”
रासायनिक खतांमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांवर टीका करत त्यांनी नैसर्गिक शेतीचे फायदे अधोरेखित केले. तसेच, निवृत्तीनंतरचा उर्वरित वेळ वेद, उपनिषद वाचण्यात घालवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नैसर्गिक शेतीवर भर
अहमदाबादमधील ‘सहकार संवाद’ कार्यक्रमात शाह यांनी रासायनिक खतांच्या दुष्परिणामांवर भाष्य केले. “रासायनिक खतांनी पिकवलेल्या गव्हामुळे कर्करोग, मधुमेह, रक्तदाब आणि थायरॉईडसारख्या समस्या वाढतात. नैसर्गिक शेतीमुळे रोग कमी होतात आणि उत्पादकता 1.5 पट वाढते,” असे त्यांनी सांगितले.
स्वतःच्या शेतात नैसर्गिक शेती करत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी सेंद्रिय शेतीमुळे पाण्याचा अपव्यय थांबत असल्याचेही सांगितले.
शाह यांनी रासायनिक खतांमुळे गांडुळांचा नाश आणि पर्यावरणाची हानी होत असल्याची चिंता व्यक्त केली. “गांडुळे निसर्गाचे खते तयार करतात, पण रासायनिक खतांनी त्यांना मारले आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता आणि पाण्याचे संवर्धन होते,” असे ते म्हणाले.
“गृहमंत्रीपद मोठे आहे, पण सहकार मंत्रालयाची जबाबदारी शेतकरी, गरीब, गावे आणि प्राण्यांसाठी आहे,” असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.