ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भाजपा पुन्हा देशभरात तिरंगा यात्रा काढणार

BJP Tiranga Yatra

नवी दिल्ली- ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने देशभरात तिरंगा यात्रा (Tiranga Yatra) काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा १० ते १४ ऑगस्टदरम्यान विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेचा उद्देश देशभक्तीची भावना जागवणे आणि भारताच्या शौर्याची जाणीव जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे. या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक राज्यात एक निमंत्रक आणि तीन सदस्यांची समिती नेमण्यात येत आहे. तर राष्ट्रीय पातळीवर या मोहिमेची जबाबदारी भाजपाचे (BJP) सरचिटणीस सुनिल बन्सल (Sunil Bansal) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

यात्रेत सुरक्षा दलांचे, शहीदांचे आणि भारताच्या संरक्षण उपकरणांचे कौतुक करणारे फलक लावले जाणार आहेत. युद्धस्मारके, स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंधित स्थळे, तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. याशिवाय, प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस, युद्धवीर आणि शहीद कुटुंबियांना सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष परवानगी घेऊन सीमा चौक्यांनाही भेट दिली जाणार असून, तेथील सैनिकांचा सन्मान केला जाईल. १४ ऑगस्ट रोजी, भारताच्या फाळणीच्या दु:खद आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘फाळणीच्या भयपट स्मृती दिना’ निमित्त मूक मिरवणुका आयोजित केल्या जातील. यात्रेदरम्यान संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि इतर नेत्यांची भाषणे जनतेसमोर दाखवण्यात येणार आहेत. तसेच, १३ ते १५ ऑगस्टदरम्यान सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर आणि प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.