Celebi Aviation License Revoked | नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या (Civil Aviation Ministry) सुरक्षा विभागाने सेलेबी एव्हिएशन (Celebi Aviation) या तुर्की (Turkey) कंपनीचा भारतातील ग्राउंड हँडलिंग परवाना तात्काळ रद्द केला. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (Bureau of Civil Aviation Security) दिलेल्या आदेशानुसार, हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी घेण्यात आला आहे.
बीसीएएसचा निर्णय काय?
15 मे 2025 रोजी जारी आदेशात, BCAS ने स्पष्टपणे म्हटले आहे की, “सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीची सुरक्षा मंजुरी राष्ट्रीय हितासाठी रद्द केली जाते. हा निर्णय इस्लामाबादला पाठिंबा दर्शवणाऱ्या तुर्कीच्या भूमिकेनंतर घेतल्याचे सुत्रांकडून सांगितले जाते.
‘सेलेबी एव्हिएशन’ कंपनी काय आहे?
सेलेबी एव्हिएशन ही तुर्कीची खासगी ग्राउंड हँडलिंग सेवा कंपनी असून 1958 मध्ये स्थापन झाली आहे. ही कंपनी व्हीलचेअर सहाय्य, रॅम्प सेवा, कार्गो व वेअरहाउस व्यवस्थापन, आणि विमानतळ लाउंज सेवा पुरवते. सध्या ही कंपनी 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय ठिकाणी कार्यरत आहे.
भारतातील सेलेबीची उपस्थिती
भारतात सेलेबी एव्हिएशनने प्रथम मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सेवा सुरू केली. पुढे दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद, गोवा, कोचीन, कन्नूर, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये कंपनीने आपली उपस्थिती वाढवली. मात्र, दिल्ली विमानतळाने BCAS च्या आदेशानंतर लगेचच कंपनीसोबतचे संबंध संपुष्टात आणले.
तुर्कीने अलीकडेच पाकिस्तानला दहशतवादी कारवायांबाबत पाठिंबा दर्शवला होता. याच पार्श्वभूमीवर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्याचा तुर्कीने निषेध केला होता. यामुळे भारतात तुर्कीविरोधात बॉयकॉट मोहिम सुरू झाली.
सेलेबी एव्हिएशनची प्रतिक्रिया
कंपनीने आपल्या निवेदनात भारतातील कार्यप्रणाली पारदर्शक असल्याचा दावा केला असून, “आमचा कोणत्याही परदेशी सरकारशी किंवा राजकीय संघटनांशी संबंध नाही. आम्ही केवळ व्यावसायिक सेवा पुरवतो आणि भारतात दीर्घकाळ कार्यरत राहण्याची बांधिलकी जपतो,” असे स्पष्ट केले आहे. मात्र BCAS कडून परवाना रद्द झाल्याबाबत कंपनीने कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही.