China PL-15 Missiles to Pakistan | पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यातच आता पाकिस्तानच्या हवाई दलाला (PAF) चीनकडून प्रगत PL-15 हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा (air-to-air missiles) पुरवठा झाल्याची माहिती समोर आली आहे.
पीएएफने अलीकडेच जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये त्यांच्या नवीन जेएफ-17 ब्लॉक III लढाऊ विमानांवर (JF-17 Block III fighter jets) PL-15 बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (BVR) क्षेपणास्त्रे बसवलेली दिसली आहेत.
रिपोर्टनुसार, पाकिस्तानला मिळालेली ही क्षेपणास्त्रे थेट चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सकडून (PLAAF) पुरवली गेली आहेत. ही PL-15E निर्यात मॉडेल नसून मूळ मॉडेल असल्याचे सांगितले जाते. जर हे खरे असेल, तर दोन्ही देशांमध्ये वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून पाकिस्तानला जलद शस्त्रास्त्र पुरवठा सुरू आहे, असे स्पष्ट होते.
PL-15 क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानी वैमानिकांना भारतीय विमानांना मोठ्या अंतरावरून लक्ष्य करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.
PL-15 क्षेपणास्त्र म्हणजे काय?
PL-15 हे चीनच्या आधुनिक हवाई युद्धतंत्राचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. चीनच्या सरकारी एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना (AVIC) ने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र सक्रिय रडार-मार्गदर्शन यंत्रणा वापरत आहे. ड्युअल-पल्स सॉलिड रॉकेट मोटरमुळे हे क्षेपणास्त्र लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी उपयुक्त आहे आणि यामध्ये अत्याधुनिक AESA (Active Electronically Scanned Array radar) रडार बसवण्यात आला आहे. टू-वे डेटालिंकमुळे मोहिमेदरम्यान मार्ग बदलता येतो, ज्यामुळे लक्ष्य अचूकतेने नष्ट करता येते.
या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 200 ते 300 किलोमीटर दरम्यान असल्याचे सांगितले जाते. झुहाई एअर शोमध्ये चीनने फोल्डिंग फिन्स (folding fins) असलेले नवे वर्जनही प्रदर्शित केले होते, ज्यामुळे जे-20 सारखी लढाऊ विमाने एकावेळी सहा क्षेपणास्त्रे वाहू शकतात.
पहलगाम हल्ल्याचे परिणाम
ही लष्करी हालचाल जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर झाली आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा गोळीबारात मृत्यू झाला. 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतर हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध तात्काळ कमी केले. भारतीय सरकारने पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सिंधू जल करार निलंबित केला आणि अटारी सीमेवरील वाहतूक थांबवली. प्रत्युत्तरात पाकिस्तानने शिमला करार गोठवण्यासह इतर द्विपक्षीय करार निलंबित केले आणि भारताच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे.