CJI Gavai remarks on Vishnu idol: देशाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई सध्या भगवान भगवान विष्णूंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ‘भगवान विष्णूला जाऊन प्रार्थना करा,’ असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
मध्य प्रदेशातील एका मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांनी हे विधान केले. सरन्यायाधीशांच्या या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत वकील आणि सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
हे प्रकरण मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर समूहांमधील जवारी मंदिराशी संबंधित आहे, जे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. राकेश दलाल नावाच्या याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी मंदिरात असलेल्या 7 फूट उंच, मुघल काळात मोडतोड झालेल्या भगवान विष्णूच्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्याची मागणी केली होती.
प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने, याचिकाकर्त्याने हा विषय श्रद्धेशी संबंधित असून तो केवळ पुरातत्वशास्त्राचा मुद्दा नाही, असा युक्तिवाद केला होता.
सरन्यायाधीशांचे नेमके वक्तव्य काय होते?
याचिकेत केलेले युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. यावेळी सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला फटकारले आणि ‘ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका आहे. आता तुम्ही स्वतः जाऊन देवाला काहीतरी करण्यासाठी सांगा. तुम्ही म्हणता तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात, तर आता जाऊन प्रार्थना करा,’ असे वक्तव्य केले.
वकिलांचा आणि सोशल मीडियाचा रोष
सरन्यायाधीशांचे हे वक्तव्य सार्वजनिक झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. अनेक युझर्सनी त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत ‘सरन्यायाधीशांना पदावरून हटवा’ अशी मागणी केली आहे.
तसेच, अनेक वकिलांनी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांना पत्र लिहून सनातन धर्म आणि भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता टीका होत आहे.
हे देखील वाचा – Conversion Act : धर्मांतर कायद्याच्या स्थगितीबाबत ८ राज्यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस