D. Y. Chandrachud Official Residence Controversy | माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) यांनी नवी दिल्लीतील सरकारी निवासस्थानातील मुक्कामावरून निर्माण झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले. लवकरच निवासस्थान खाली करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मुदतीनंतरही सरकारी बंगल्यात राहण्यामागचे कारण सांगितले आहे.
या वादावर बोलताना चंद्रचूड म्हणाले की, सामान पॅक झाले असून, ते लवकरच पत्नी कल्पना आणि दिव्यांग मुली, प्रियांका आणि माही, यांच्यासह नव्या घरी स्थलांतरित होतील. मुलींच्या वैद्यकीय गरजा आणि व्हीलचेअर-अनुकूल घराची आवश्यकता यामुळे स्थलांतरास विलंब झाल्याचे त्यांनी नमूद केले.
मुलींच्या वैद्यकीय स्थितीमुळे अडचण
8 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त झालेले चंद्रचूड यांनी सांगितले की, त्यांच्या मुलींना नेमलाइन मायोपॅथी नावाचा दुर्मिळ जनुकीय विकार आहे, ज्यामुळे त्यांना विशेष काळजी आणि व्हीलचेअर-अनुकूल घराची गरज आहे.
“आमचे सामान पॅक झाले आहे. काही सामान नव्या घरी गेले आहे, तर काही स्टोअररूममध्ये आहे. मुलींच्या वैद्यकीय गरजांमुळे आम्ही काही आठवड्यांत दुसऱ्या घरात राहायला जाऊ,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी मुलींच्या नियमित थेरपी आणि विशेष परिचारिकेची गरज यावरही भर दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) प्रशासनाने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाला पत्र लिहून चंद्रचूड यांनी 5, कृष्णा मेनन मार्ग बंगला रिकामा न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या नियम 3बी (2022) नुसार, माजी सरन्यायाधीश निवृत्तीनंतर सहा महिन्यांपर्यंत टाईप VII बंगला ठेवू शकतात, परंतु चंद्रचूड यांचा मुक्काम 10 मे 2025 नंतरही सुरू असल्याने वाद निर्माण झाला.
चंद्रचूड यांनी स्पष्ट केले की, माजी सरन्यायाधीश यू. यू. ललित आणि एन. व्ही. रमणा यांनाही निवासस्थानात मुदतवाढ मिळाली होती. “मला सरकारने घर देणारी पहिली व्यक्ती नाही. इतर न्यायाधीशांनाही आपत्कालीन परिस्थितीमुळे मुदतवाढ मिळाली आहे,” असे त्यांनी सांगितले. सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनीही त्यांना बंगल्यात राहण्यास सांगितले होते, कारण खन्ना यांना अधिकृत निवासस्थानाची गरज नव्हती.