NDA Vice President Candidate C P Radhakrishnan : काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) सी. पी. राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांची आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Vice Presidential election) उमेदवार म्हणून निवड केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सी. पी. राधाकृष्णन कोण आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.
सी. पी. राधाकृष्णन कोण आहेत? (Who is CP Radhakrishnan)
सी. पी. राधाकृष्णन यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तामिळनाडूच्या (Tamil Nadu) तिरुपूरमध्ये झाला. त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) खूप जुना संबंध आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी, म्हणजेच 1973 मध्येच ते संघात सामील झाले होते. संघप्रचारक म्हणून त्यांनी काम केले आणि याच विचारांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची पायाभरणी झाली.
त्यांनी 1998 मध्ये भाजपच्या तिकिटावर कोईम्बतूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेची (Lok Sabha) निवडणूक जिंकली. विशेष म्हणजे, 1998 आणि 1999 या दोन्ही निवडणुकांमध्ये ते सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2004 ते 2007 या काळात त्यांनी तामिळनाडू भाजपचे अध्यक्षपदही भूषवले.
राज्यपालपदापासून उपराष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास
राधाकृष्णन यांच्या राजकीय कारकिर्दीला एक मोठे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा 2023 मध्ये त्यांची झारखंडचे (Jharkhand) राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. यानंतर, 2024 मध्ये त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपालपद स्वीकारण्यापूर्वी त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणूनही अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. राज्यपाल म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या घटनात्मक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
‘तामिळनाडूचे मोदी’
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी असलेल्या त्यांच्या जवळच्या संबंधांमुळे आणि दक्षिण भारतात (South India) भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे, त्यांना अनेकदा ‘तामिळनाडूचे मोदी’ म्हणून ओळखले जाते. ते दक्षिण भारतातील भाजपचे सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या राजकीय अनुभवामुळे आणि दूरदृष्टीमुळे त्यांना उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार मानले जात आहे.
राधाकृष्णन यांनी 2014 मध्ये तैवानला गेलेल्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या राजकीय अनुभवामुळे आणि दूरदृष्टीमुळे त्यांना उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार मानले जात आहे. ही निवड दक्षिण भारतातील एका ज्येष्ठ नेत्याला दिलेली मोठी संधी मानली जात आहे. संसदेतील एनडीएच्या संख्याबळामुळे राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदासाठी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.