नवी दिल्ली- तिबेटी धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) कायद्याने आपला उत्तराधिकारी निवडू शकत नाही असे विधान चीनचे भारतातील राजदूत शु फेईहोंग (शु फेईहोंग) यांनी केले आहे. दलाई लामांनी उत्तराधिकारी निवडण्याची घोषणा केल्यानंतर चीनने त्याला सातत्याने विरोध केला आहे.
चीनचे राजदूत फेईहोंग यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, १४ वे दलाई लामा हे ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचा भाग आहेत. दलाई लामांचा पुनर्जन्म त्यांच्यापासून झालेला नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर तो संपणारही नाही. ही परंपरा सुरु ठेवण्याचा वा संपवण्याचा त्यांना अधिकार नाही. पुनर्जन्माची प्रथा सुरु ठेवण्यात येणार आहे की नाही हे ते एकटे ठरवू शकत नाहीत.
दलाई लामा यांनी २ जुलैला धरमशाला इथे एका विडियो संदेशात आपला उत्तराधिकारी नेमण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचबरोबर तो चीनमधील नसावा असेही म्हटले होते. तेव्हापासून चीनने त्यांच्या या भूमिकेचा सातत्याने विरोध केला आहे. भारताचे संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी दलाई लामांच्या घोषणेचे समर्थन केले होते. त्यानंतर चीनने नाराजी व्यक्त केली होती. तिबेटशी संबंधित मुद्द्यांवर भारताने सावधगिरी बाळगावी असेही चीनने सुचवले होते. त्यानंतर भारताने या विषयात मौन बाळगले होते. चीनच्या भारतातील राजदूतांनी आता अधिकृतपणे दलाई लामा यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.