Delhi Red Fort: दिल्लीतील हवेच्या प्रदूषणामुळे केवळ नागरिकांच्या आरोग्यावरच नाही, तर शहरातील ऐतिहासिक वास्तूंनाही धोका निर्माण झाला आहे. एका नव्या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या प्रदूषणामुळे युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या लाल किल्ल्याची झीज होत आहे.
‘हेरिटेज’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे दिसून आले आहे की, खराब हवेच्या गुणवत्तेमुळे लाल किल्ल्याच्या रचनेला आणि सौंदर्याला धोका पोहोचत आहे. तसेच, किल्ल्यावर काळा थर जमा होत आहे.
मुघल सम्राट शाहजहान यांनी 1639 मध्ये या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली होती आणि 1648 मध्ये ते पूर्ण झाले.
अभ्यासात काय आढळले?
संशोधकांनी केलेल्या तपासणीत लाल किल्ल्याच्या लाल वालुकामय दगडांच्या भिंतींवर जाड काळा थर जमा झाल्याचे आढळले. 2021 ते 2023 या कालावधीतील दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केल्यानंतर, संशोधकांनी किल्ल्याच्या भिंतींवरील या काळ्या थराचे नमुने घेतले.
प्रयोगशाळेतील तपासणीत या थरात जिप्सम, क्वार्ट्ज आणि शिसे, तांबे, जस्त यांसारखे जड धातू असल्याचे समोर आले. हे सर्व प्रदूषक वाहनांमधून निघणारा धूर, बांधकामाची धूळ आणि औद्योगिक कचरा यांचे घटक आहेत.
प्रदूषणाचे नेमके कारण
‘कॅरॅक्टरायझेशन ऑफ रेड सँडस्टोन अँड ब्लॅक क्रस्ट टू ॲनालाइज एअर पोल्युशन इम्पॅक्ट्स ऑन ए कल्चरल हेरिटेज बिल्डिंग’ या शीर्षकाखालील हा अभ्यास भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि इटलीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. यामध्ये आयआयटी रुरकी, आयआयटी कानपूर आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) च्या शास्त्रज्ञांचा समावेश होता. संशोधकांना आढळले की, प्रदूषक आणि लाल वालुकामय दगडांमधील रासायनिक अभिक्रियेमुळे तयार झालेले हे थर 0.05 mm ते 0.5 mm जाड होते आणि त्यामुळे किल्ल्याच्या कोरीव कामाचे नुकसान होत आहे.
संरक्षण आणि उपाययोजना
संशोधकांनी सांगितले की, हा काळा थर हळूहळू तयार होणारा आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यात तो काढल्यास दगडांचे मोठे नुकसान टाळता येऊ शकते. तसेच, सर्वाधिक प्रभावित भागांवर देखरेख आणि संरक्षणासाठी विशेष रसायने वापरून ही प्रक्रिया थांबवता येऊ शकते.
हे देखील वाचा – ‘माझे मित्र नरेंद्र मोदी’; ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, ‘या’ मुद्द्यांवर झाली महत्त्वाची चर्चा