प्राध्यापकांकडून मानसिक छळ दंतवैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Dental student commits suicide due to mental harassment by professor

नवी दिल्ली- प्राध्यापकांनी सातत्याने केलेल्या मानसिक छळाला कंटाळून नॉईडाच्या (Noida) शारदा विद्यापीठातील (Sharda University) दंतवैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने आत्महत्या (Suicide)केली आहे. ही मुलगी काल रात्री वसतीगृहामध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने या प्राध्यापकांच्या त्रासाचा उल्लेख केला आहे. त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शारदा विद्यापीठात ही मुलगी बीडीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. तिच्या खोलीतून मिळालेल्या चिठ्ठीत तिने महाविद्यालयातील एक पुरुष व एक महिला प्राध्यापकांनी तिचा वारंवार मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे. मुलीच्या पालकांनीही याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तिने आत्महत्या केल्याचे विद्यार्थ्याना समजल्यानंतर त्यांनीही महाविद्यालयाच्या प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे विद्यापीठातील आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करुन विद्यार्थ्यांना शांत केले. विद्यापीठाच्या प्रशासनाने या दोन्ही प्राध्यापकांना निलंबित केल्याचे म्हटले असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणात इतरही कोणी दोषी असतील तर त्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात येईल असेही प्रशासनाने म्हटले आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून आता विद्यापीठातील स्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.