‘गेम ऑफ थ्रोन्स’ मधील भयानक लांडगे प्रत्यक्षात! 12,500 वर्षांनी प्रत्यक्षात अवतरली लुप्त झालेली प्रजाती

Dire Wolf | गेम ऑफ थ्रोन्स या वेब सीरिजने एकेकाळी सर्वांनाच वेड लावले होते. आजही ही सीरिज पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्ही ही वेब सीरिज पाहिली असेल, तर यातील स्टार्क कुटुंबासोबत असणाऱ्या लांडग्यांबाबत माहिती असेलच. केवळ काल्पनिक वाटणारे या भयानक लांडग्यांची प्रजाती आता पुनरुज्जीवित करण्यात आली आहे.

टेक्सास (Texas) येथील Colossal Biosciences या बायोटेक कंपनीने सुमारे 12,500 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या भयानक लांडग्याची (Dire Wolf) प्रजाती पुनरुज्जीवित केली आहे. या प्रयोगातून 1 ऑक्टोबर 2024 रोजी दोन नर आणि 30 जानेवारी 2025 रोजी एक मादी अशा तीन शावकांचा जन्म झाला. या पिल्लांना ‘रोम्युलस’ आणि ‘रेमस’ अशी नावे देण्यात आली आहेत.

सध्या ही पिल्ले अवघी 6 महिन्यांची असूनही त्यांची उंची जवळपास 4 फूट आहे आणि वजन 36 किलोहून अधिक आहे. Colossal ने प्राचीन DNA, क्लोनिंग आणि जनुकीय संपादन (Genetic Editing) तंत्रज्ञानाचा वापर करून हे प्रयोग यशस्वी केले. या संशोधनाने आंतरराष्ट्रीय विज्ञान क्षेत्रात उत्सुकता निर्माण केली आहे.

‘Game of Thrones’ या प्रसिद्ध HBO मालिकेमुळे भयानक लांडग्याला जागतिक प्रसिद्धी मिळाली होती. या लांडग्याचे सर्वात जवळचे नातेवाईक ग्रे वुल्फ (Grey Wolf) यांच्या DNA चा वापर या प्रयोगात झाला. भूतकाळात उत्तर अमेरिका (North America) खंडात फिरणारा हा लांडगा, ग्रे वुल्फच्या तुलनेत आकाराने मोठा, जाड फर असलेला आणि अधिक मजबूत जबड्याचा शिकारी प्राणी होता.

Colossal चे सह-संस्थापक आणि हार्वर्ड (Harvard) तसेच एमआयटी (MIT) येथील प्राध्यापक Dr. George Church यांनी ‘Time’ मासिकाला सांगितले की, “EPC पेशींमधून क्लोनिंगची प्रभावी क्षमता मिळत आहे, ही बाब खऱ्या अर्थाने ‘Game Changer’ आहे.”

Colossal च्या माहितीनुसार, जन्मानंतर काही दिवस पिल्लांना सरोगेट मातेकडून दूध देण्यात आले. सध्या ही तिघेही पिल्ले निरोगी असून स्वतंत्रपणे वाढत आहेत. सध्या हे लांडगे 2,000 एकर क्षेत्रात 10 फूट उंच कुंपणात संरक्षित करण्यात आले आहेत, जिथे त्यांचं निरीक्षण ड्रोन, सुरक्षा रक्षक आणि थेट कॅमेऱ्यांद्वारे होत आहे.

या पिल्लांचे वर्तन सध्या अस्तित्वात असलेल्या लांडग्यांपेक्षा वेगळे असल्याचे वैज्ञानिकांनी निरीक्षणात घेतले आहे. मानवांच्या उपस्थितीत हे पिल्ले कोणताही आनंद व्यक्त करत नाहीत; अगदी संगोपन करणाऱ्या व्यक्तीच्याही अधिक जवळ गेल्यास ते मागे हटतात. हे त्यांच्या नैसर्गिक स्वभावाचे लक्षण असल्याचे मानले जात आहे.भयानक लांडगे एकाकी आणि सावध स्वभावाचे होते.

Colossal कंपनी सध्या Woolly Mammoth, Dodo आणि Tasmanian Tiger यांसारख्या अन्य नामशेष प्रजातींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांवरही काम करत आहे. काही प्रकल्पांमध्ये मर्यादित यश मिळालं असलं तरी, भयानक लांडग्याच्या पुनरुज्जीवनामुळे संशोधक उत्साही आहेत.