भारत-पाक शस्त्रसंधीवर ट्रम्प यांचा यू-टर्न! मध्यस्थीच्या दाव्याबाबत आता म्हणाले…

Donald Trump on India-Pakistan Ceasefire

Donald Trump on India-Pakistan Ceasefire | भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये 10 मे रोजी शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या दोन्ही देशांनी याबाबत माहिती देण्याआधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी याबाबत घोषणा केली होती. ट्रम्प यांनी वारंवार याबाबतचा उल्लेख देखील केला. मात्र, आता त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून यू-टर्न घेत दोन्ही देशातील शस्त्रसंधीसाठी आपली कोणतीही भूमिका नसल्याचे म्हटले आहे.

कतारमधीलअल-उदेद हवाई तळावर तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकांना संबोधित करताना त्यांनी या शस्त्रसंधी उल्लेख केला. मात्र, त्यांनी यावेळी आपला दावा काहीसा सौम्य करत, “मी असे म्हणू इच्छित नाही की माझ्यामुळे हे झाले, पण मी नक्कीच यात मदत केली,” असे म्हणत सावध भूमिका घेतली.

ट्रम्प म्हणाले, “गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत होता. अचानक, तुम्ही वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचे स्फोट पाहिले. मग आम्ही हस्तक्षेप केला आणि ते थांबले. मला आशा आहे की मी इथून गेल्यानंतर पुन्हा तणाव सुरू झालेला नसेल.”

पुढे बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी “व्यापारावर भर” दिला. “मी त्यांना म्हटले, युद्ध नको – व्यापार करा. दोघंही खूप खूश झाले. मी काहीही शांत करू शकतो,” असे ते म्हणाले. याआधीही ट्रम्प यांनी वारंवार आपण दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला होता.

भारत सरकारची स्पष्ट भूमिका – ‘व्यापार चर्चाच झाली नाही’

मात्र ट्रम्प यांच्या या दाव्यांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल (यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) दरम्यान अमेरिकेसोबत लष्करी परिस्थितीवर चर्चा झाली, पण व्यापारावर कोणतीही चर्चा (no झाली नव्हती.

ते म्हणाले, “7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून 10 मे रोजी संघर्षविरामापर्यंत, भारतीय आणि अमेरिकी नेत्यांमध्ये सुरक्षा परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र, व्यापाराशी संबंधित कोणतीही गोष्ट समोर आली नाही.”