Home / देश-विदेश / ‘झेलेन्स्की रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात’; नाटोचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

‘झेलेन्स्की रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात’; नाटोचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Trump on Ukraine-Russia war

Trump on Ukraine-Russia war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युक्रेन-रशिया युद्धाबद्दल (Ukraine-Russia war) मोठे विधान केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांना हे युद्ध तात्काळ थांबवता येऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. झेलेन्स्की यांच्यासोबतच्या भेटीपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर याबाबत भाष्य केले.

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, “युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना हवे असेल तर हे युद्ध जवळजवळ लगेच थांबवता येऊ शकते. अन्यथा ते युद्ध सुरू ठेवू शकतात.”

ट्रम्प यांनी 2014 मध्ये ओबामा प्रशासनाच्या काळात रशियाने क्रिमियावर (Crimea) ताबा मिळवल्याचा उल्लेख केला. तसेच, युक्रेनला नाटोमध्ये (NATO) समाविष्ट न करण्याचा मुद्दाही त्यांनी पुन्हा एकदा मांडला आहे.

रशियाने नाटोच्या विस्ताराला नेहमीच विरोध केला आहे. “कशाप्रकारे याची सुरुवात झाली हे लक्षात ठेवा. 12 वर्षांपूर्वी ओबामांनी क्रिमिया परत मिळवला नाही आणि युक्रेन नाटोमध्ये सामील झाला नाही. काही गोष्टी कधीच बदलत नाहीत!!!” असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले.

पुतिन-ट्रम्प यांची भेट

दरम्यान, गेल्या आठवड्यात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यासोबत अलास्कामध्ये ट्रम्प यांची बैठक पार पडली. मात्र, या भेटीनंतरही युक्रेन-रशिया युद्धावर कोणताही तोडगा निघाला नव्हता. आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. झेलेन्स्की यांच्यासोबतच काही यूरोपियन राष्ट्रांचे प्रमुख देखील बैठकीला उपस्थित असतील. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर युद्धावर कोणता तोडगा निघणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.