Sharmishta Panoli | ‘या’ देशाच्या खासदाराचा शर्मिष्ठा पानोलीला पाठिंबा, मोदींकडे केली मदतीची मागणी

Dutch MP Geert Wilders Supports Sharmishta Panoli

Dutch MP Geert Wilders Supports Sharmishta Panoli | धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या 22 वर्षीय शर्मिष्ठा पानोली या कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला आता परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. डच संसदेत उजव्या विचारसरणीचे राजकारणी आणि ‘पार्टी फॉर फ्रीडम’चे नेते गीर्ट विल्डर्स यांनी पानोलीच्या अटकेवर नाराजी व्यक्त करत ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

गीर्ट विल्डर्स यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “शूर शर्मिष्ठा पानोलीला सोडा! तिची अटक हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान आहे. तिने फक्त सत्य बोलले. त्यासाठी तिला शिक्षा देऊ नका. नरेंद्र मोदी यांनी तिची तातडीने मदत करावी.” या पोस्टसोबत ‘All Eyes on Sharmistha’ असा संदेश असलेला फोटोही शेअर करण्यात आला.

शर्मिष्ठाला कोलकाता पोलिसांनी अटक केली असून तिच्यावर धार्मिक भावना भडकावणाऱ्या, द्वेषभावना पसरवणाऱ्या, शांततेला बाधा आणणाऱ्या पोस्ट्स केल्याचा आरोप आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काही बॉलिवूड कलाकारांनी मौन बाळगल्यावर तिने टीका केली होती. या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना तिने विशिष्ट धर्माला उद्देशून टीका केली होती.

मात्र, तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. नंतर तिने ती पोस्ट डिलीट केली आणि माफी मागितली होती. मात्र, कोलकाता पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केले होते.

तिच्या अटकेनंतर राजकीय वाद पेटला आहे. भाजप (BJP) आणि मित्रपक्षांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे. जन कल्याण सेनेचे नेते पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी म्हटले की, “शर्मिष्ठा ही विद्यार्थिनी आहे. तिने चूक मान्य करून व्हिडिओ डिलीट केला आणि माफी मागितली. पण जेव्हा निवडून आलेले खासदार सनातन धर्माची टिंगल करतात, तेव्हा पोलिस तितक्या तत्परतेने का कारवाई करत नाहीत?”

दरम्यान, कोलकाता पोलिसांनी सांगितले की, अटकेच्या प्रक्रियेत सर्व कायदेशीर बाबींचे पालन करण्यात आले आहे. “तिला अनेक वेळा नोटीस दिली गेली, पण ती अनुपलब्ध राहिल्यामुळे न्यायालयीन वॉरंटनंतर तिला गुरुग्राम येथून अटक करण्यात आली. ट्रान्झिट रिमांड घेऊन तिला कोलकात्याला आणले गेले. सोशल मीडियावर फिरणारी अर्धवट माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे,” असे पोलिसांनी स्पष्ट केले.