Trump-Musk feud | अब्जाधीश टेक उद्योजक इलॉन मस्क (Elon Musk) आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यातील वाद सध्या शिगेला पोहोचला आहे. मस्क यांनी उघडपणे ट्रम्प यांच्याविरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग आणून त्यांना पदावरून हटवण्यास पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, मस्क यांनी ट्रम्प यांच्या जागी जे.डी. व्हान्स (JD Vance) यांना पसंती दिली आहे.
एका सोशल मीडिया यूजरने ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचीमागणी करत जे.डी. व्हान्स यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केले होते. या पोस्टला मस्क यांनी “हो” असे उत्तर दिल्याने दोघांमधील वाद अधिकच वाढल्याचे पाहायला मिळाले.
— Elon Musk (@elonmusk) June 5, 2025
मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर अनेक स्फोटक आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांचे नाव जेफ्री एपस्टीनच्या (Jeffrey Epstein) फाईल्समध्येअसल्यामुळे ती कागदपत्रे आजवर सार्वजनिक झालेली नाहीत. “हेच खरे कारण आहे की एपस्टीनची माहिती बाहेर आलेली नाही.” असे मस्कने एक्सवर म्हटले.
‘बिग ब्युटीफुल बिल’
या वादाची खरी सुरुवात ट्रम्प यांच्या “बिग ब्युटीफुल बिल” (Big Beautiful Bill) या कर आणि खर्च विधेयकावरून झाली.एका मुलाखतीत मस्क यांनी या विधेयकावर टीका केली होती. त्यांनी म्हटले, “मला वाटते, एखादे विधेयक मोठे किंवा सुंदर असू शकते. पण दोन्ही एकत्र शक्य आहे का, हे कळत नाही.” मस्कचा आरोप आहे की, या बिलामुळे अर्थसंकल्पीय तूट वाढत आहे.
या विधेयकात इलेक्ट्रिक वाहनांसाठी असलेली सवलत कमी केल्याचा आरोप मस्क यांनी केला. ट्रम्प यांनी दावा केला की, मस्क यांना आधी काही अडचण नव्हती, पण जेव्हा त्यांना EV सवलतीत कपात होणार हे कळले, तेव्हाच त्यांनी विरोध केला.
मात्र मस्क यांनी प्रत्युत्तर दिले की, हे विधेयक त्याला दाखवलेच गेले नाही. “हे बिल इतक्या गुपचूप पद्धतीने पास झाले की काँग्रेसच्या सदस्यांनाही ते नीट वाचता आले नाही,” असे त्याने स्पष्ट केले.
सरकारी करार रद्द करण्याची धमकी आणि स्पेसएक्सचा निर्णय
ट्रम्प यांनी मस्कच्या कंपन्यांचे सरकारी करार रद्द करण्याची धमकी दिली. त्यावर मस्कने पलटवार करत जाहीर केले की, स्पेसएक्सने आपले ‘ड्रॅगन स्पेसक्राफ्ट’ डिमिशनिंग () सुरू केले आहे. हे स्पेसक्राफ्ट नासासाठी अतिशय महत्त्वाचे असून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर अंतराळवीरांना नेण्याचे आणि आणण्याचे काम करते.
सध्या मस्क आणि ट्रम्प यांच्यातील शाब्दिक वाद अधिक तीव्र झाला असून, यातून राजकीय आणि व्यावसायिक पातळीवरील संघर्ष स्पष्टपणे समोर येत आहे. मस्कच्या थेट आरोपांमुळे आणि ट्रम्पच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे हा संघर्ष केवळ वैयक्तिक पातळीवर न राहता अमेरिकेच्या राजकीय आणि उद्योगजगताच्या समीकरणांनाही धक्का देणारा ठरतोय.