World’s Richest Person : अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान मिळवले आहे. मात्र, काही तासांसाठी त्यांच्या या स्थानाला धक्का बसला होता. ऑरेकलचे प्रमुख लॅरी एलिसन (Larry Ellison) यांनी मस्क यांना काही तासांसाठी मागे टाकले होते
मात्र दिवस संपता-संपता मस्क यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान मिळवले. ओरॅकल च्या शेअरमध्ये झालेल्या विक्रमी वाढीमुळे ही श्रीमंतांच्या यादीतील उलथापालथ झाली.
ओरॅकलच्या शेअर्समध्ये मोठी वाढ
ओरॅकलच्या शेअरमध्ये मंगळवारी जाहीर झालेल्या दमदार तिमाही निकालानंतर मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) इन्फ्रास्ट्रक्चर सेवांना वाढती मागणी असल्यामुळे शेअर्स 43% पर्यंत वाढले.
या वाढीमुळे लॅरी एलिसन यांच्या संपत्तीत तब्बल $89 अब्जची वाढ झाली आणि ती $383.2 अब्जपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे, ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये एलिसन यांच्या संपत्तीत एका दिवसात101 अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवली गेली, जो आजपर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे.
ओरॅकल आणि ओपनएआय (OpenAI) यांच्यात झालेल्या एका मोठ्या कराराची बातमीही समोर आली आहे. वाल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, ओपनएआयने सुमारे 5 वर्षांसाठी ओरॅकलसोबत $300 अब्जचा करार केला आहे. हा करार 2027 पासून सुरू होणार आहे.
शेवटी मस्कच ठरले अव्वल
मस्क यांनी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये पुन्हा अव्वल स्थान मिळवत अवघ्या काही तासात लॅरिसन यांना मागे टाकले. बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती $384.2 अब्ज होती, जी एलिसन यांच्यापेक्षा $1 अब्जने अधिक होती. मस्क यांनी 2021 पासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान राखले आहे.
2021 मध्ये एलव्हीएमएच चे बर्नार्ड अरनॉल्ट आणि 2024 मध्ये ॲमेझॉनचे जेफ बेझोस यांनी काही काळासाठी त्यांना मागे टाकले होते, पण मस्क पुन्हा पहिल्या स्थानावर आले आणि जवळपास 300 दिवस त्यांनी ते स्थान कायम राखले.
मस्क यांची संपत्ती मुख्यत्वेकरून त्यांच्या टेस्ला, स्पेसएक्स आणि इतर उद्योगांमधील भागीदारीवर अवलंबून आहे.
हे देखील वाचा –