‘नारी शक्ती’चा गौरव! आस्था पूनिया बनली नौदलाची पहिली महिला फायटर पायलट

Astha Poonia

Astha Poonia | भारतीय नौदलाच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. सब लेफ्टनंट आस्था पूनिया (Astha Poonia) नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट (Fighter Pilot) म्हणून प्रशिक्षणार्थी बनल्या आहेत.हॉक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या (Hawk ‘विंगिंग’ समारंभात त्यांना ‘विंग्ज ऑफ गोल्ड’ (Wings of Gold) प्रदान करण्यात आले.

या ऐतिहासिक टप्प्यामुळे त्या भविष्यात विमानवाहू नौकांवरून मिग-29के किंवा राफेल फायटर जेट उडवू शकतील. पूनियांच्या या यशाने नौदलात लैंगिक समावेशकता आणि नारी शक्तीला प्रोत्साहन मिळाले आहे.

नौदलाने निवेदनात म्हटले की, सब लेफ्टनंट आस्था पूनिया यांनी फायटर स्ट्रीममध्ये प्रवेश करत अनेक अडथळे पार केले. रिअर ॲडमिरल जनक बेवली यांच्या हस्ते लेफ्टनंट अतुल कुमार धुल आणि पूनिया यांना ‘विंग्ज ऑफ गोल्ड’ प्रदान करण्यात आले. पूनिया यांनी नौदल विमानचालनात महिलांसाठी नव्या युगाचा मार्ग मोकळा केला आहे. यापूर्वी नौदलाने सागरी टेहळणी विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये महिला वैमानिकांना समाविष्ट केले आहे.

पूनिया यांनी हॉक 132 ॲडव्हान्स्ड जेट ट्रेनरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले, जे 2013 पासून भारतीय नौदलात वापरले जाते. यामुळे त्या आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकांवरून मिग-29के किंवा राफेल फायटर जेट उडवण्यासाठी पात्र ठरतील. त्यांच्या या यशाने नौदलातील लैंगिक समावेशकता ( अधोरेखित झाली आहे.

नौदलाने म्हटले की, पूनिया यांचे यश हे ‘नारी शक्ती’ आणि समानतेच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. भारतीय नौदल महिलांना वैमानिक आणि नौदल हवाई ऑपरेशन्स अधिकारी म्हणून प्रोत्साहन देत आहे. पूनिया यांच्या यशाने तरुण महिलांना लष्करी विमानचालनात करिअर करण्याची प्रेरणा मिळेल.