केरळमधील कासारगोड जिल्ह्याच्या बांदादुक्का जंगलाजवळच्या श्रीमाला गावात 68 वर्षीय वेदावती या वृद्ध महिला अनेक वर्षांपासून राहत आहेत. मात्र, आता त्यांना जंगली हत्तींपासून (Wild Elephants) मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता वन अधिकारी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. जंगलात राहणाऱ्या या वृद्ध महिलेच्या सुरक्षेसाठी वन अधिकारी रात्रभर त्यांच्या घराबाहेर पहारा देतात.
मातीचे घर व वीज नसल्याने रात्री अन्नाच्या शोधात येणाऱ्या हत्तीकडून त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशा स्थितीमध्ये आता मंदाकोले बीटचे वन अधिकारी (Forest Officials) आता त्यांच्या मदतीला धावले आहेत. याबात मनोरमा या वेबसाइटने वृत्त दिले आहे.
बांदडका विभागाचे वन अधिकारी एम. पी. राजू यांनी सांगितले की, गस्तीवर असताना त्यांना वेदावतींची परिस्थिती समजली. त्यानंतर, ज्या रात्री हत्तींची जास्त हालचाल असते, त्या रात्री आर. के. राहुल आणि त्यांच्या टीममधील इतर अधिकारी वेदावतींच्या घरी रात्रभर पहारा देतात. हत्ती कर्नाटकातून केरळमध्ये आल्यास त्यांना तात्काळ अलर्ट (Alert) मिळते आणि ते वेदावतींना सतर्क करतात.
वेदावती 15 वर्षांपासून एकट्या राहत आहेत. त्यांचा मुलगा कर्नाटकात रोजंदारीवर काम करतो, तर मुलगी विवाहित आहे. घरात वीज, विहीर किंवा बाथरूमसारख्या मूलभूत सुविधा नाहीत. पाण्यासाठी त्यांना लांब जावे लागते, जे त्यांच्यासाठी वाढत्या वयामुळे आणि कमी दृष्टीमुळे कठीण झाले आहे.
वन अधिकारी आता त्यांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केरळ राज्य वीज मंडळाने ) त्यांच्या घरी वीज पोहोचवण्यासाठी खांब बसवण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच, विभागीय वन अधिकारी अशरफ यांनी बाथरूम आणि इतर मूलभूत गरजांसाठी 1 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
वृद्ध महिलेच्या नावावर जमीन नसल्यामुळे त्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही, त्यामुळे वन अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना किमान घराचा आणि थोड्या जमिनीचा भाग त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याची विनंती करत आहेत, जेणेकरून त्यांना निवृत्तीवेतन (Pension) आणि इतर फायदे मिळू शकतील. एकट्या वृद्ध महिलेच्या मदतीसाठी अशाप्रकारे वन अधिकारी पुढे आल्याने स्थानिक भागात हा चर्चेचा विषय ठरला व यासाठी वन अधिकाऱ्यांचे कौतुक देखील होत आहे.