K Kasturirangan Passes Away | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (Indian Space Research Organisation – Isro) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन (K Kasturirangan) यांचे शुक्रवारी बेंगळूरु येथील निवासस्थानी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.
इस्रोने जारी केलेल्या निवेदनानुसार, कस्तुरीरंगन यांचे 25 एप्रिलला निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार, 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत बेंगळूरु येथील रमण रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जनतेच्या आदरांजलीसाठी ठेवण्यात येणार आहे.
कस्तुरीरंगन यांनी नऊ वर्षांहून अधिक काळ इस्रो, अवकाश आयोग आणि अंतराळ विभागाचे नेतृत्व केले. त्यांनी 27 ऑगस्ट 2003 रोजी पदाचा राजीनामा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी इस्रो अध्यक्षांना दूरदृष्टीचे नेते म्हणून आदरांजली वाहिली. ते म्हणाले, “भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रवासातील एक महान व्यक्तिमत्व डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व आणि राष्ट्रासाठी केलेले निस्वार्थ योगदान नेहमीच स्मरणात राहील.”
पंतप्रधान पुढे म्हणाले की, डॉ. कस्तुरीरंगन यांनी इस्रोमध्ये अत्यंत निष्ठेने सेवा बजावली आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेले, ज्यामुळे देशाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. “त्यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाकांक्षी उपग्रह प्रक्षेपण झाले आणि त्यांनी नवोन्मेषावर लक्ष केंद्रित केले,” असेही पंतप्रधान म्हणाले.
शिक्षण सुधारणांचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे कस्तुरीरंगन यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. त्यांनी 2003 ते 2009 पर्यंत राज्यसभेचे सदस्य आणि तत्कालीन भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही कार्य केले.
कस्तुरीरंगन यांनी इस्रो उपग्रह केंद्राचे संचालक म्हणूनही काम केले, जिथे ते INSAT-2, IRS-1A/1B आणि वैज्ञानिक उपग्रहांच्या विकासात सक्रियपणे सहभागी होते.
ते भारताच्या पहिल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहांपैकी असलेले भास्कर 1 आणि 2 चे प्रकल्प संचालक होते आणि त्यांनी PSLV आणि GSLV प्रक्षेपणांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांचे निरीक्षण केले होते. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
प्रशिक्षणाने खगोलभौतिकशास्त्रज्ञ असलेले कस्तुरीरंगन यांच्या संशोधनाच्या आवडीच्या विषयात उच्च-ऊर्जा एक्स-रे आणि गॅमा रे खगोलशास्त्राचा समावेश होता. त्यांनी वैश्विक एक्स-रे स्रोत, आकाशीय गॅमा किरणे आणि पृथ्वीच्या वातावरणावर होणारे त्यांचे परिणाम यांवरील अभ्यासात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.