पणजी – गोवा सरकारचे राजभाषा संचालनालय आता सरकारी कर्मचाऱ्यांना कोकणी भाषेचे प्रशिक्षण देणार आहे. सरकारी खात्यांमध्ये कोकणी भाषेतील पत्रव्यवहारांना कोकणी भाषेतच उत्तर देण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठीची कार्यशाळा ११ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. त्यामुळे सर्व सरकारी खात्यांनी त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांचे अर्ज सादर करावेत, असे निर्देश राजभाषा संचालनालयाने सर्व सरकारी खाते प्रमुखांना दिले आहेत. त्यासाठी एक परिपत्रक जारी केले आहे. जी पत्रे कोकणी भाषेत असतील, त्यांना कोकणीमध्येच उत्तर द्यावे. त्यामुळे प्रत्येक खाते प्रमुखांनी या भाषेतील पत्रव्यवहारांना योग्य प्रतिसाद देणे हे त्यांचे काम आहे. यासंदर्भात, सर्व खाते प्रमुखांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी जास्तीत जास्त ३ कर्मचाऱ्यांना राजभाषा प्रशिक्षणासाठी ४ दिवसांसाठी नियुक्त करावे. नियुक्त होणारा कर्मचारी पुढील १० वर्षांसाठी सेवेत असावा आणि त्याला कोकणीचे सामान्य ज्ञान असावे. खातेप्रमुखांनी २४ जुलैपूर्वी गुगल फॉर्मद्वारे त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांची नावे पाठवावीत असे निर्देश या सरकारी परिपत्रकात दिले आहेत.