Goa Stampede | गोव्यात लइराई देवी यात्रेत चेंगराचेंगरी; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Goa Lairai Devi Jatra Stampede

Goa Lairai Devi Jatra Stampede | गोव्यातील शिरगाव येथे आज (3 मे) पहाटे वार्षिक लइराई देवी यात्रेदरम्यान (Lairai Devi Jatra Stampede ) चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत किमान 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

राज्याची राजधानी पणजीपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री देवी लइराई मंदिरात (Sree Devi Lairai Temple) ही घटना घडली. मोठ्या धार्मिक मेळाव्यात अचानक भीतीचे वातावरण पसरल्याने हजारो भाविकांमध्ये एकच धावपळ झाली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, लोकांनी दाट गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ निर्माण होऊन ही घटना (Goa Stampede) घडली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी शिरगावमधील चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल “दुःख” व्यक्त केले आहे.

“ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल संवेदना. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे,” असे पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाने ‘एक्स’ वर पोस्ट केले आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

“परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी स्वतः लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक ती सर्व पाऊले उचलली जात आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी माझ्याशी बोलून परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली आणि या कठीण काळात पूर्ण पाठिंबा दर्शवला,” असे त्यांनी ‘एक्स’ वर लिहिले आहे.

अधिकाऱ्यांनी अद्याप चेंगराचेंगरीच्या नेमक्या कारणाची पुष्टी केलेली नाही, परंतु प्राथमिक अहवालांनुसार अत्यधिक गर्दी आणि गर्दी नियंत्रणाच्या उपायांच्या अभावामुळे ही घटना घडली.

लइराई देवी जत्रा उत्तर गोव्यातील शिरगाव गावात दरवर्षी आयोजित केली जाते. हा देवी लैराईचा उत्सव आहे, ज्यांना देवी पार्वतीचा अवतार आणि गोव्याच्या लोककथांमधील सात बहिणींच्या देवतांपैकी एक मानले जाते.

हा उत्सव ‘अग्निदिव्य’ सारख्या अनोख्या विधींसाठी ओळखला जातो, जिथे ‘धोंड’ नावाचे भाविक आशीर्वाद घेण्यासाठी जळत्या कोळशाच्या विस्तवावरून अनवाणी चालतात. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील हजारो भाविक या वार्षिक महोत्सवात सहभागी होतात.